यावेळी रमेश लटके यांच्या वडिलांनी म्हटले की, माझ्या सूनेला मिळत असलेले यश हे जनतेच्या जीवावर आहे. ती या निवडणुकीत नक्कीच निवडून येईल. तिने निवडून आल्यावर आपल्या पतीने केलेली कामं पुढे न्यावीत. जनतेशी चांगल्याप्रकारे राहावे, असे कोंडिराम लटके यांनी म्हटले. माझा मुलगा रमेश लटके याने अंधेरी पूर्व मतदारसंघात जी कामं केली होती, त्यामुळे जनतेचा त्याच्यावर असलेला विश्वास हा निकालात दिसून येत आहे. माझ्या सूनेने हीच परंपरा पुढे न्यावी. तिने चांगली कामं करावीत. अडीअडचणीच्या प्रसंगात जनतेच्या मदतीला धावून जावे, असा सल्ला ऋतुजा लटके यांच्या सासऱ्यांनी दिला.
सकाळी आठ वाजल्यापासून याठिकाणी मतमोजणीला सुरुवात झाली असून आतापर्यंत पाच फेऱ्या पार पडल्या आहेत. यामध्ये ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांना १७२७८ मतं पडली आहेत. तर अपक्षांना मागे टाकत नोटा पर्यायाला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता ऋतुजा लटके यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. ऋतुजा लटके यांनी पहिल्या फेरीपासून अपेक्षेप्रमाणे भक्कम आघाडी घेतली आहे. मात्र, मतदानाच्या काही दिवस आधी नोटाला मतदान करा, असा पद्धतशीर प्रचार अंधेरी पूर्व मतदारसंघात झाला होता. त्याचा परिणाम निकालांमध्ये पाहायला मिळत आहे. आतापर्यंत नोटाला ३८५९ मतं मिळाली आहेत.
अंधेरी पोटनिवडणूक पाचव्या फेरीचा निकाल खालीलप्रमाणे
* ऋतुजा लटके – 17278
* नोटा – 3859
* बाळा नडार – 570
* मनोज नाईक – 365
* मीना खेडेकर – 516
* फरहान सय्यद – 378
* मिलिंद कांबळे – 267
* राजेश त्रिपाठी – 538