ऑस्ट्रेलियाचा संघ बाहेर गेल्यानं पाकिस्तानी चाहत्यांना वेगळाच योगायोग दिसू लागला आहे. तीन दशकांपूर्वी घडलेल्या घटनाक्रमाची पुनरावृत्ती होईल आणि पाकिस्तानी संघ विश्वचषक जिंकेल अशी आशा चाहत्यांना आहे. पाकिस्ताननं १९९२ मध्ये विश्वचषक स्पर्धा जिंकली. त्यावेळी ऑस्ट्रेलियाला उपांत्य फेरी गाठता आली नव्हती. विशेष म्हणजे १९८७ चा विश्वचषक ऑस्ट्रेलियानं जिंकला होता. त्यामुळे १९९२ मध्ये कांगारुंचा संघ स्पर्धेत गतविजेता म्हणून सहभागी झाला होता. विशेष म्हणजे १९९२ ची स्पर्धा ऑस्ट्रेलियात झाली होती.
यंदाही योगायोग जुळून येणार?
१९८७ ची विश्वचषक स्पर्धा आशियात झाली. ती ऑस्ट्रेलियानं जिंकली. त्यानंतर १९९२ ची विश्वचषक स्पर्धा ऑस्ट्रेलियात झाली. मात्र घरच्या परिस्थितीत ऑस्ट्रेलियाला उपांत्य फेरीदेखील गाठता आली नाही. २०२१ मध्ये ऑस्ट्रेलियानं आशिया खंडात टी-२० विश्वचषक स्पर्धा जिंकली. मात्र त्यानंतर यंदा होत ऑस्ट्रेलियन भूमीवर होत असलेल्या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला उपांत्य फेरीत प्रवेश करणंही जमलेलं नाही. १९९२ मध्ये ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून लवकर बाहेर पडल्यावर जेतेपद पाकिस्ताननं पटकावलं होतं. यंदाही ऑस्ट्रेलियन संघाचं आव्हान उपांत्य फेरीच्या आधीच संपुष्टात आल्यानं पाकिस्तानला जेतेपदाची संधी असल्याचं पाकिस्तानी चाहत्यांना वाटत आहे.
१९९२ ची पुनरावृत्ती होतेय, पण एक अपवाद
१९९२ मध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ लवकर बाद झाला. त्यावेळी न्यूझीलंड, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्ताननं उपांत्य फेरी गाठली होती. पण यंदा चित्र वेगळं आहे. पहिल्या गटातून न्यूझीलंड, इंग्लंडनं उपांत्य फेरी गाठली आहे. पण दक्षिण आफ्रिकेला उपांत्य फेरीत पोहोचला आलेलं नाही. आफ्रिकेच्या जागी भारतानं उपांत्य फेरीत धडक मारली आहे.