t20 world cup 2022: टी-२० विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीतील संघ ठरले आहेत. पहिल्या गटातून न्यूझीलंड आणि इंग्लंडनं उपांत्य फेरी गाठली. तर दुसऱ्या गटातून भारत आणि पाकिस्ताननं उपांत्य फेरीत धडक मारली आहे. पाकिस्तानची स्पर्धेतील सुरुवात अडखळत झाली. मात्र नेदरलँड्स, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशला पराभूत पाकिस्ताननं उपांत्य फेरीत प्रवेश केला.

दुसऱ्या गटातून भारत आणि पाकिस्ताननं उपांत्य फेरी गाठली आहे. पाकिस्ताननं सलग तीन विजयांसह उपांत्य फेरी गाठली आहे. पाकिस्तान आणि भारताचे प्रत्येकी ६ गुण आहेत. मात्र नेट रनरेट सरस असल्यानं पाकिस्तानचा संघ गटात अव्वल आहे. भारतानं झिम्बाब्वेचा पराभव केल्यास त्यांचे ८ गुण होतीत आणि टीम इंडिया गटात अव्वल स्थानी पोहोचेल. त्यामुळे पाकिस्तान दुसऱ्या स्थानावर येईल.
उपांत्य फेरीत कोणाचा सामना?
भारतासाठी झिम्बाब्वेविरुद्धचा सामना महत्त्वाचा आहे. हा सामना जिंकल्यास भारत गटात अव्वल स्थान पटकावेल. त्यामुळे उपांत्य फेरीत भारताचा मुकाबला इंग्लंडशी होईल. पण आज झिम्बाब्वेनं भारताला पराभवाचा धक्का दिल्यास भारताला गटात दुसऱ्या स्थानी राहावं लागेल. अशा परिस्थितीत भारताला उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा सामना करावा लागेल.
न्यूझीलंड भारतासाठी धोकादायक संघ
न्यूझीलंडचं आव्हान भारतासाठी कायमच अवघड ठरलं आहे. टी-२० विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंड कायमच भारतावर भारी ठरला आहे. टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंड आतापर्यंत तीनदा आमनेसामने आले आहेत. या तिन्ही सामन्यात किवींनी विजय मिळवला आहे. ५० षटकांच्या विश्वचषक स्पर्धांतही न्यूझीलंड वरचढ राहिला आहे. आठपैकी पाच सामन्यांत न्यूझीलंडनं विजय मिळवला असून तीनमध्ये भारत जेता ठरला आहे.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.