म. टा. प्रतिनिधी, : सावकारीमध्ये ४९ लाख रुपये कर्ज घेतलेले असताना त्यापोटी तब्बल दोन कोटी रुपये वसूल करून आणखी पैशांची मागणी आणि धमक्या देणाऱ्या कोंढवा येथील घन:श्याम उर्फ पप्पू पडवळ याला वैतागून एका कर्जदाराने त्याचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. गेल्या आठवड्यात कोंढवा येथील पडवळच्या खुनाचा गुन्हा उघडकीस आणून कोंढवा पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे.

लतिफ आबू शेख (वय ४३, रा. पारगेनगर, कोंढवा) असे या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या प्रमुख संशयिताचे नाव आहे़. कोंढवा येथे ११ जुलैला पप्पू पडवळ याचा खून झाल्याचे उघडकीस आले होते. पडवळ हा काही वर्षांपासून व्याजाने पैसे देण्याचा व्यवसाय करीत होता. त्याने शेख याला वेळोवेळी ४९ लाख रुपये दिले होते. शेख हा स्क्रॅप व फॅब्रिकेशनचे काम करतो. कर्ज घेताना त्याने फ्लॅट व कागदपत्रे गहाण ठेवली होती. घेतलेल्या कर्जापोटी शेख याने पडवळला आतापर्यंत दोन कोटी रुपये दिले होते. मात्र, तरीही पडवळ त्याच्याकडे पैशाची मागणी करीत होता. तसेच, ‘८० लाख रुपये १५ तारखेपर्यंत दिले नाही तर तुझा खून करतो,’ अशी धमकीदेखील त्याने दिली होती. त्यामुळे शेख याने दोन साथीदारांच्या मदतीने पडवळच्या खुनाचा कट रचला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

व्याजाने कोणाला पैसे दिले याची नोंद पडवळ हा आपल्या डायरीमध्ये करीत होता. पोलिसांना त्याच्या घरातून ही डायरी मिळाली होती. तो ३५ टक्के व्याज दराने पैसे देत असल्याचे पोलिसांच्या पाहणीमध्ये समोर आले. यामध्ये अनेकांची नावे होती. पोलिसांनी गेल्या चार-पाच दिवसांत सर्व तांत्रिक विश्लेषण करून त्यापैकी अनेकांकडून माहिती घेतली. त्यामध्ये शेख याच्यावर संशय वाढला. त्यांनी ९ जुलै रोजी शेख कोठे-कोठे गेला होता, याची घेतली. त्याने सांगितलेल्या ठिकाणी पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा तो तेथे गेला नसल्याचे उघड झाले. पोलिसांना सर्व समजल्याचे लक्षात आल्यावर शेख याने गुन्हा कबुल केला.

पोलिस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलिस आयुक्त सुनील कलगुटकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड, पोलिस निरीक्षक महादेव कुंभार यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी हा गुन्हा उघडकीस आणला.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here