यंदाचा टी-२० विश्वचषक अनेक बड्या संघांना मोठे धक्के देणारा ठरला. इंग्लंड, श्रीलंका, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका यांच्यासारख्या बलाढ्य संघांना नामिबिया, आर्यलंड, झिम्बाब्वे, नेदरलँडनं पराभूत केलं. कालपर्यंत दक्षिण आफ्रिकेचा उपांत्य फेरीतील प्रवेश जवळपास निश्चित मानला जात होता. आज त्यांचा नेदरलँडशी सामना होता. या सामन्यात विजय मिळवल्यास त्यांचा उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित होता. मात्र दक्षिण आफ्रिकेनं पुन्हा एकदा कच खाल्ली.

गोलंदाजांच्या सुरेख प्रयत्नांना क्षेत्ररक्षकांनी अफलातून साथ दिली. १५ षटकांनंतर आफ्रिकेची स्थिती ४ बाद १११ धावा होती. डेव्हिड मिलर आणि क्लासेन मैदानात असल्यानं आफ्रिकेच्या आशा जिवंत होत्या. मात्र १५ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर मिलरनं षटकार ठोकण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा फटका चुकला. चेंडू उंच हवेत उडाला. नेदरलँडचा व्हॅन डर मर्व्ह ३० यार्ड वर्तुळातून सीमारेषेच्या दिशेनं पळत सुटला आणि त्यानं अवघड वाटणारा झेल अतिशय सुरेख टिपला. मिलर बाद झाल्यानं आफ्रिकेचा संघ अतिशय अडचणीत सापडला आणि पराभवाच्या आणखी जवळ पोहोचला.
मर्व्हचं वय सध्या ३७ वर्षे आहे. मात्र विशीतल्या तरुणाला लाजवेल असा अफलातून झेल त्यानं घेतला. विशेष म्हणजे मर्व्ह ११ वर्षांपूर्वी आफ्रिकेकडूनच खेळायचा. त्याचा जन्म दक्षिण आफ्रिकेतला. २००९ ते २०११ या कालावधीत तो आफ्रिकेकडून २६ आंतरराष्ट्रीय सामने खेळला. यात प्रत्येकी १३ एकदिवसीय आणि टी-२० सामन्यांचा समावेश आहे. २०१५ मध्ये त्यानं नेदरलँडचा पासपोर्ट मिळवला. जुलै २०१५ मध्ये तो नेदरलँडसाठी पहिला सामना खेळला. आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये दोन देशांकडून खेळलेला तो केवळ पाचवा खेळाडू आहे.