नवी दिल्ली : देशभरातील ६ राज्यातील ७ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले आहेत. महाराष्ट्र, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा, तेलंगाणामधील एकूण ७ मतदारसंघातील निकाल आज जाहीर झाले आहेत. ७ पैकी ४ जागांवर भाजपनं विजय मिळवला आहे. तर, महाराष्ट्रात शिवसेनेनं एक, बिहारमध्ये राजदनं एक आणि तेलंगाणामध्ये तेलंगाणा राष्ट्र समितीनं एका जागेवर विजय मिळवला आहे. पोटनिवडणुकीच्या निकालांमध्ये काँग्रेसनं दोन जागा गमावल्या आहेत.

बिहारमध्ये राजदचे नेते अनंत सिंह हे दोषी ठरल्यानं त्यांचं सदस्यपद रद्द झालं होतं. त्यांच्या जागेवर त्यांच्या पत्नी नीलम देवी यांना राजदनं उमेदवारी दिली होती. त्या विजयी झाल्या आहेत. लालू प्रसाद यादव यांच्या बालेकिल्ल्यातील गोपालगंज मतदारसंघात भाजपनं आपली जागा राखली आहे. भाजपच्या कुसुम देवी विजयी झाल्या आहेत. ही जागा यापूर्वी भाजपकडेच होती.

उत्तर प्रदेशमध्ये भाजपनं गोला गोरखनाथ मतदारसंघात विजय मिळवला आहे. भाजपच्या अमन गिरी यांनी सपाच्या उमेदवाराचा पराभव केला आहे. यापूर्वी ही जागा भाजपकडेच होती.

हरियाणामध्ये माजी मुख्यमंत्री भजनलाल यांचा नातू भाव्य बिष्णोई यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. कुलदीप बिष्णोई यांना पक्षांतर बंदी कायद्यानुसार आमदारकी गमवावी लागली होती. तिथं भाव्य बिष्णोई यांनी काँग्रेस उमेदवाराचा पराभव केला.

तेलंगाणामध्ये मुनगोडे या मतदारसंघात तेलंगाणा राष्ट्र समितीच्या उमेदवारानं भाजपच्या उमेदवाराचा १० हजार मतांनी पराभव केला आहे. टीआरएसचे प्रमुख के. चंद्रशेखर राव यांनी ही लढत प्रतिष्ठेची केली होती. ही जागा यापर्वी काँग्रेसकडे होती. मात्र, या मतदारसंघात टीआरएस आणि भाजपमध्ये अटीतटीची लढत झाली. यात, टीआरएसनं विजय मिळवला. टीआरएसचे के.पी. रेड्डी विजयी झाले.

ओडिशामध्ये भाजपनं धामनगर मतदारसंघावरील वर्चस्व कायम ठेवलं आहे. भाजपच्या उमेदवारानं तिथं बिजू जनता दलाच्या उमेदवाराचा पराभव केला. भाजप आमदाराच्या निधनानं ही जागा रिक्त झाली होती. भाजपचे सूर्यभंशी सुरज या ठिकाणी विजयी झाले.

महाराष्ट्रातील अंधेरी पूर्व या विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ऋतुजा रमेश लटके विजयी झाल्या. ऋतुजा लटके यांना एकूण ८६५७० मतांपैकी ६६५३० मते मिळाली. ऋतुजा लटके यांच्या विरोधात भाजपनं उमेदवारी अर्ज मागं घेतला होता. ऋतुजा लटके विरुद्ध अपक्ष उमेदवार अशी त्या ठिकाणी लढत झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here