मुंबई : मर्यादित षटकांच्या क्रिकेट फॉरमॅटमध्ये अव्वल दर्जाचा फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) भारतीय संघासाठी एक नवा आशेचा किरण म्हणून उदयास आला आहे. चौथ्या क्रमाकांवर खेळायला यावं, अगदी काही षटकं शिल्लक असावीत, अन् उरलेल्या चेंडूमध्ये सूर्याने धमाका करुन भारताला धावांचा डोंगर उभा करुन द्यावा, हे अगदी आता नित्याचं झालंय. आज झिम्बॉब्वेविरोधातील वर्ल्डकपच्या टी ट्वेन्टी सामन्यात सूर्याच्या बॅटिंगने प्रतिस्पर्धी संघाची धुळधाण उडाली. ऑफ स्टम्पच्या अगदी बाहेरच्या चेंडूवर सूर्याने फाईन लेगला षटकार मारला, तो क्षण तर भारतीय क्रीडा रसिक पुढची अनेक वर्ष विसरणार नाहीत. सूर्याने आज फाईन लेगला असे आकर्षक, नयनरम्य आणि देखणे फटके मारले, ज्याने भारतीय क्रीडा रसिकांचे डोळे सुखावून गेले. झिम्बाब्वेविरोधातील विजयानंतर ज्यावेळी रोहित शर्मा मनोगत व्यक्त करत होता, तेव्हा त्याने सूर्याची तोंडभरुन तारीफ केली. आपला कर्णधार आपल्यावर स्तुतीसुमनांची उधळ करतो आहे, हे पाहून सूर्याला अगदी भरुन आलं होतं. स्मितहास्य करत तर कधी शेजारच्या खेळाडूला टाळी देत सूर्याने रोहितचं मनोगत ऐकलं आणि रोहितचं मनोगत संपल्यावर जवळ जात त्याला थँक्सही म्हटलं…!

टी ट्वेन्टी विश्वचषकाच्या सुपर १२ टप्प्यातील अंतिम सामन्यात, भारताने रविवारी झिम्बाब्वेचा ७१ धावांनी पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. यासह भारताने गट २ मध्ये गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. रनरेटच्या बाबतीतही भारताने पाकिस्तानला मागे टाकले आहे. आता १० नोव्हेंबरला सेमीफायनलमध्ये टीम इंडियाचा सामना इंग्लंडशी होणार आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने पाच गडी गमावून १८६ धावा केल्या. कर्णधार रोहित आज लवकरच बाद झाला. सलामीवीर के एल राहुलने मागच्या सामन्याचा फॉर्म कायम ठेवत शानदार अर्धशतक झळकावलं. विराटही २६ धावांवर बाद झाला. मग नंबर होता सूर्या आणि हार्दिकचा… पुढील डावाची सूत्रे सूर्याने हाती घेतली. मग १४ व्या ओव्हरपासून अखेरच्या ओव्हरपर्यंत सूर्या शो सुरु होता. केवळ २५ चेंडूत सूर्याने ६१ धावा कुटल्या. त्याच्या या खेळीला त्याने ६ चौकार आणि ४ षटकारांचा साज चढवला.

झिम्बाब्वेच्या बोलर्सला रडवलं, तलवारीसारखी बॅट चालवली, रेकॉर्डनंतर सूर्यकुमार म्हणतो, मी संघाला…
सूर्याची बॅटिंग पाहून रोहितही धन्य झाला. क्रिकेटिंग फॉरमॅटमध्ये ऑफ स्टम्पवरील स्टेंडू फाईन लेगच्या दिशेने खेळणं अवघड मानलं जातं. पण सूर्याने जो षटकार खेचला, ते पाहून अख्खं स्टेडियम स्तब्ध झालं. रोहित तर एकटक पाहतच राहिला. याच खेळीचं त्याने आपल्या मनोगतादरम्यान वर्णन केलं. तो म्हणाला, “आम्ही सूर्याच्या अशाच बॅटिंगची नेहमी प्रतिक्षा करतो. गेले काही दिवस सूर्यकुमार देशासाठी ज्या इनिंग खेळतोय, ते पाहण्यायोग्य आहेत. तो जसाही मैदानावर येतो, तो त्याच्या स्टाईलने फटकेबाजी सुरु करायला लागतो. आम्ही फक्त त्याचा खेळ एन्जॉय करत असतो. तो मैदानावर आला की सहकारी खेळाडूंचं मनावरचं ओझं हलकं होतं. त्यामुळे दुसऱ्या एंडला बॅटिंग करणाऱ्या खेळाडूला वेळ मिळतो. त्याच्या क्षमता आम्ही खूप चांगल्या प्रकारे जाणून आहोत.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here