नांदेड : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो यात्रा’ मंगळवारी महाराष्ट्रात प्रवेश करत आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यामध्ये ही यात्रा दाखल होणार असून, पुढील चार दिवस या यात्रेचा प्रवास नांदेड जिल्ह्यातून होणार आहे. या यात्रेसाठी काँग्रेसकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. तर, नांदेड पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी देगलूरमध्ये तळ ठोकून आहेत.
राहुल गांधी यांची ही यात्रा तेलंगणमधून देगलूरमध्ये प्रवेश करणार आहे. या यात्रेसाठी प्रदेश पातळीवरील अनेक दिग्गज नेते नांदेडमध्ये दाखल झाले आहेत. या यात्रेत काँग्रेसबरोबरच महाविकास आघाडीतील अन्य घटक पक्षाचे नेतेही सहभागी होणार आहेत. तसेच, काही सामाजिक संघटनांचाही या यात्रेत सहभाग असेल. नांदेडच्या नवा मोंढा मैदानावर १० नोव्हेंबर रोजी या यात्रेतील राज्यातील पहिली सभा होईल. या सभेला काँग्रेस नेत्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जोगेंद्र कवाडे यांच्यासह शिवसेनेचे ज्येष्ठ नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. प्रशांत दामलेंसाठी अमिताभ बच्चन यांचं मराठीत खास ट्विट म्हणाले.. मी तिथं नसलो तरी मनाने…
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, आमदार अमर राजूरकर, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी यात्रेच्या तयारीवर लक्ष ठेऊन आहेत. राज्याच्या वेगवेगळ्या भागांतून येणारे नेते, आमदार, पदाधिकारी यांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे. मोठा काळ ही यात्रा जिल्ह्यात राहणार असल्यामुळे, स्थानिक पदाधिकाऱ्यांची दमछाकही होत आहे. यात्रेच्या निमित्ताने काँग्रेसने जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी करण्यात आली आहे.
काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राज्याचे समन्वयक बाळासाहेब थोरात, मोहन जोशी, माजी मंत्री नसीम खान यांच्यासह काँग्रेसचे अनेक नेते नांदेडमध्ये दाखल झाले आहेत. यात्रेदरम्यान अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया चव्हाण यांचा सक्रिय राजकारणात प्रवेश होणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्सुकता दिसून येत आहे. काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर मल्लिकार्जुन खरगे प्रथमच नांदेडमध्ये येत आहेत. त्यांच्या भेटीकडेही कार्यकर्त्यांचे लक्ष आहे.