मुंबई : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आता काही तासांत महाराष्ट्रात दाखल होणार असून, या यात्रेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या सहभागाबाबत अनिश्चितता वर्तविली जात आहे. परंतु, पक्षातील अन्य नेते सहभागी होतील, असे उद्धव ठाकरे यांनी रविवारी स्पष्ट केले. महासंवाद यात्रेच्या निमित्ताने आदित्य ठाकरे दौऱ्यावर असल्याने तेही भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याची शक्यता नसल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सोमवारी सायंकाळी महाराष्ट्रात दाखल होत आहे. सध्या तेलंगणमध्ये असलेली ही यात्रा नांदेड जिल्ह्यातील देगलूरमार्गे महाराष्ट्रात दाखल होत आहे. यात्रेच्या भव्य स्वागताची तयारी प्रदेश काँग्रेसने केली आहे. या यात्रेत उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सहभागी व्हावे, यासाठी काँग्रेसच्या एका शिष्टमंडळाने नुकतीच या दोन्ही नेत्यांची भेट घेतली होती.

राहुल गांधींची ‘भारत जोडो यात्रा’ आज महाराष्ट्रात धडकणार; काँग्रेसकडून जय्यत तयारी

त्यानंतर हे दोन्ही नेते या यात्रेत सहभागी होणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, या यात्रेत आपण सहभागी होण्याचे अजून ठरले नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी रविवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे. त्यातच आदित्य ठाकरे हे सध्या महासंवाद यात्रेवर जाणार असल्याने त्यांच्याही सहभागाबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. हे दोन्ही नेते सहभागी होणार नसले, तरी शिवसेनेचे इतर अनेक नेते या यात्रेत सहभागी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here