BJP and Raj Thackeray | संजय काकडे यांनी भाजपने पालिका निवडणुकीसाठी मनसेशी युती करण्याचा स्पष्ट विरोध दर्शविला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अलीकडेच महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजप कोणत्या पक्षाशी युती करणार, याचा निर्णय स्थानिक पातळीवरील नेते घेईल, असे सांगितले होते. त्यामुळे आता पुण्यातील भाजपच्या इतर नेत्यांनी संजय काकडे यांची री ओढल्यास मनसे-भाजप युती अस्तित्त्वात येऊन शकणार नाही.

हायलाइट्स:
- बाळा नांदगावकर हे गिरीश बापट साहेबांना भेटले
- अशा गाठीभेटी या सर्वच पक्षांमध्ये होत असतात
- याचा अर्थ त्या पक्षांची युती होईलच, असा नसतो
संजय काकडे यांनी राज ठाकरे यांच्या पूर्वीच्या वक्तव्यांचा दाखला देत मनसे-भाजप युतीला विरोध केला आहे. बाळा नांदगावकर हे गिरीश बापट साहेबांना भेटले. अशा गाठीभेटी या सर्वच पक्षांमध्ये होत असतात. याचा अर्थ त्या पक्षांची युती होईलच, असा नसतो. मी स्वत: पुण्यात भाजपने मनसेशी युती करावी, या मताचा नाही. तसेच राज्य पातळीवरही भाजपने मनसेशी युती करू नये, हा भाजपचा प्रदेश उपाध्यक्ष म्हणून माझा सल्ला असल्याचे संजय काकडे यांनी सांगितले. राज ठाकरे यांनी २०१९ च्या निवडणुकीत ‘लाव रे तो व्हिडिओ’च्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत वाईट शब्दांत टीका केली होती. अशा प्रवृत्तीच्या माणसासोबत युती करणे मला योग्य वाट नाही. हे माझं वैयक्तिक मत आहे, पक्षपातळीवर काय होईल, ते मला माहिती नाही. पण भाजपला मनसेशी युती करण्याची अजिबात गरज नाही, असे संजय काकडे यांनी सांगितले.
पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप आणि मनसेची युती झाली तरी त्यांची मतं आमच्या उमेदवाराला ट्रान्सफर होणार नाहीत. मनसे ही शिवसेनेतून फुटून बाहेर आल्यामुळे ती एकप्रकारे शिवसेनेची बी टीम आहे. त्यामुळे मनसेशी युती करुन आम्ही उमेदवार रिंगणात उतरवले तरी पुण्यातील मनसैनिक भाजपऐवजी मूळ शिवसेनेलाच मत देणे पसंत करतील. त्यामुळे मनसेशी युती करू नये, हा माझा आग्रह आहे. भाजपला कोणासोबत युतीच करायची असेल तर आपला पारंपरिक मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेसोबत युती होऊ शकते, असे संजय काकडे यांनी म्हटले. आता पुण्यातील राजकीय वर्तुळात संजय काकडे यांच्या या वक्तव्याचे काय पडसाद उमटणार, हे पाहावे लागेल.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.