एस. एम. ग्लोबल नामक कथित कंपनी विरोधात यश दीपक घोसाळकर यांनी मंडणगड पोलीस ठाणे येथे १८ ऑक्टोबर २०२२ रोजी दाखल केलेल्या तक्रारीनंतर मंडणगड पोलिसांनी या प्रकरणात पोलीस तपास सुरू केला. वेगवेगळ्या लोकांचे जाबजवाब नोंदविण्यात आले. पोलिसांनी ४ नोव्हेंबर २०२२ रोजी मंडणगड नगरपंचायतीचे स्वीकृत नगरसेवक हरेष मर्चंडे (राहणार – मंडणगड) याच्यासह परेश वणे, निलेश रक्ते (राहणार पाले) अशा तिघांना अटक केली आहे.
१८ ऑक्टोबर २०२२ रोजी आठ जणांच्या विरोधात साठ लाखांची आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार नोंद करण्यात आली होती. त्यानंतर आमचीही याच कंपनीकडून फसवणूक झाल्याची तक्रार करण्यासाठी अनेकजण आता पुढे येऊ लागले आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. शनिवार, ५ नोव्हेंबर २०२२ रोजी ताब्यात घेण्यात आलेल्या तीन संबंधितांना पुढील कार्यवाहीकरिता खेड येथील सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी त्यांनी चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, या आर्थिक गुन्हा फसवणूक प्रकरणी आणखीही काही तक्रार अर्ज मंडणगड पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. अनेक गुंतवणूकदारांकडून पैसे दुप्पट करण्यासारख्या काही स्कीममधे काही अटी व शर्थी घालून घेत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. या प्ररकरणी अद्याप तपास सुरू आहे अशी माहिती तपासि अधिकारी पोलीस निरीक्षक शैलजा सावंत यांनी ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाइन’ जवळ बोलताना दिली.
Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times