रायगड : मुंबई-गोवा महामार्गावरील पोलादपूरजवळ चोळई गावच्या हद्दीत वाळू वाहतूक करणारा डंपर रिक्षावर उलटल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात वाळूखाली गाडले गेल्याने रिक्षातून प्रवास करणाऱ्या चार जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये रिक्षाचालकासह तीन तरुणींचा समावेश आहे. सोमवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगावच्या दिशेने ही प्रवासी रिक्षा जात होती. यावेळी डंपरचालकाचे नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाला. घटनास्थळी पोलीस यंत्रणा, रेस्क्यू टीम, महसूल प्राशासन, कशेडी महामार्ग पोलीस टीम यांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले. हे मदतकार्य रात्री उशिरापर्यंत सुरू होते. अवजड असलेला डंपर रिक्षावरून काढण्यासाठी हायड्रोलिक क्रेनची मदत घेण्यात आली. पण वाळूखाली गाडले गेल्याने यात चारही जणांचा मृत्यू झाला आहे.

मेट्रोच्या प्रवासी संख्येत ११ हजारांनी वाढ; अंधेरीचा गोखले पूल बंद झाल्याचा परिणाम

अपघातातील मृतांची नावे :

१. हालीमा अब्दुल सलाम पोपेरे (वय २३ वर्ष, नांदवी), २. अमन उमर बहुर (वय ४६ वर्ष, गोरेगाव), ३. आसिया सिद्दीक (वय २० वर्ष, गोरेगाव) आणि नाजमीन मुफीद करबेलकर (वय २२ वर्ष) अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची नावे आहेत.

दरम्यान, या अपघातानंतर रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून मदत जाहीर केली आहे. ‘रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथील कशेडी घाटात ट्रक आणि रिक्षा यांचा अपघात झाला असून या अपघातात चार व्यक्तींच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे,’ अशी माहिती सामंत यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here