shivsena abdul sattar, अब्दुल सत्तारांविरोधात कारवाईचा बडगा? सुप्रिया सुळेंबाबतच्या वक्तव्यानंतर अडचणी वाढण्याची शक्यता – state womens commission instructs police to take action on agriculture minister abdul sattars controversial statement on ncp mp supriya sule
पुणे : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने आक्षेपार्ह विधाने करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नेते आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार सोमवारी पुन्हा एकदा बरळले. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांचा पुन्हा तोल गेला व त्यांनी सुळे यांच्याविषयी अनुद्गार काढले. यानंतर राज्यभर संताप उफाळला व सत्तार यांच्यावर टीकेचा भडीमार झाला. राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक होत मुंबई, औरंगाबाद, पुणे, नाशिकसह राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केले. मुंबईतील सत्तार यांच्या शासकीय बंगल्यासमोर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या संतप्त कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. तर दुसरीकडे, राज्य महिला आयोगाने पोलिस महासंचालकांना पत्र लिहून सत्तार यांच्या विधानाप्रकरणी कायदेशीर कारवाई करून त्याचा अहवाल सादर करावा, असे सांगितले आहे.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी सोमवारी ट्वीट करून पोलिस महासंचालकांना पाठविलेले पत्र प्रसिद्ध केले. महिलांना अपमानास्पद वागणूक देत, आक्षेपार्ह विधाने करत त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवत कर्तृत्वहनन करणाऱ्या अशा वक्तव्याची आयोगाने दखल घेतली आहे, असं चाकणकर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे याप्रकरणी आगामी काळात सत्तार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रायगडमध्ये भीषण अपघात: वाळू वाहतूक करणारा डंपर रिक्षावर कोसळला; ३ तरुणींसह रिक्षाचालक ठार
पुण्यात अब्दुल सत्तार यांच्याविरोधात तक्रार दाखल
वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी पुण्यातील कोथरूड पोलिस ठाण्यात अब्दुल सत्तार यांच्याविरोधात कोथरूड युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष गिरीश गुरणानी यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यांनी पुरावा म्हणून सत्तार यांच्या वक्तव्याची व्हिडिओ क्लिप कोथरूड पोलिसांकडे सुपूर्द केली आहे. अब्दुल सत्तार यांच्याविरोधात कलम ५०४, ५०५ व २६८ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात यावा व कठोर कारवाई व्हावी, अशी विनंती करणारे पत्र राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप व बाळासाहेब बडे यांच्याकडे दिले आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांत अब्दुल सत्तारांनी अनेक आक्षेपार्ह विधाने केली आहेत. आदित्य ठाकरे यांचा ‘छोटा पप्पू’ असा उल्लेख सत्तारांनी केला होता. तसेच बीड जिल्हाधिकाऱ्यांना सत्तारांनी ‘चहा पित नाही तर दारू पिता काय, असा प्रश्न विचारला होता. सातत्याने आक्षेपार्ह विधाने करणाऱ्या सत्तारांनी यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचे मात्र राज्यभर तीव्र पडसाद उमटले आहेत. स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आणि सत्तारांना सुप्रिया सुळे यांची माफी मागण्याचे आदेश दिले.