पुणे : शिरूर तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली आणि राष्ट्रवादीसह भाजपने प्रतिष्ठेची केलेली रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार यांनी विरोधकांना पुन्हा एकदा धोबीपछाड दिला आहे. अशोक पवार यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनेलने भाजपसह इतर विरोधी पक्षांच्या घोडगंगा किसान क्रांती पॅनेलचा अक्षरशः धुव्वा उडवला आहे.

घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या २० जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलमध्ये तब्बल १९ जागांवर विजय मिळवला असून विरोधकांना केवळ एका जागेवर समाधान मानावं लागलं आहे. विधानसभा निवडणुकीनंतर शिरूरमध्ये भाजपची ताकद कमी झाल्याची चर्चा होती. त्यातच आता कारखान्याच्या निवडणुकीत एकहाती विजय मिळवत अशोक पवार यांनी पुन्हा एकदा आपलं राजकीय वर्चस्व सिद्ध केलं आहे.

पुण्यात बंद पाडला ‘हर हर महादेव’चा शो; संभाजी ब्रिगेड आक्रमक, सरकारकडे केली ‘ही’ मागणी

साखर कारखान्याच्या २१ जागांपैकी ब गटातून अशोक पवार यांचे पुत्र ऋषिराज पवार यांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाल्याने उर्वरित २० जागांसाठी ७१. ६६ टक्के मतदान झाले होते.

दरम्यान, या निवडणुकीच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीच्या राज्यपातळीवरील मोठ्या नेत्यांनी सभा घेतल्या होत्या. यामध्ये विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, दिलीप वळसे पाटील आणि धनंजय मुंडे यांच्याही सभांचा समावेश होता. अजित पवार यांच्या सभेआधी विरोधकांनी लावलेल्या बॅनर्समुळे राजकीय तणावही निर्माण झाला होता. मात्र या निवडणुकीत अखेर बाजी मारत आमदार अशोक पवार यांनी विरोधकांना अस्मान दाखवलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here