बुलढाणा : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह शब्दांत टीका केल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नेते आणि राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे वादात सापडले आहेत. राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने राज्यपालांना भेटून सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. तसंच राज्यभर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून आक्रमक आंदोलने करण्यात येत आहेत. या राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर अब्दुल सत्तार यांचा आजचा बुलडाणा जिल्हा दौरा रद्द करण्यात आला आहे.

अब्दुल सत्तार हे आज सकाळी सिंदखेडराजा येथे राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थळाचे दर्शन घेऊन चांगेफळ येथील अखंड हरीनाम सप्ताहाच्या सांगता कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते. परंतु कालपासून राष्ट्रवादीने राज्यभरात ठिकठिकाणी सत्तारांचा निषेध केला आहे. तसंच बुलडाणा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने अब्दुल सत्तारांना जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा दिल्याने सत्तार यांनी दौराच रद्द केला.

अब्दुल सत्तारांच्या वक्तव्याचं समर्थन करणार नाही : देवेंद्र फडणवीस

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून काल संध्याकाळी अब्दुल सत्तारांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला होता. तसंच आज सत्तार हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असल्याचं सांगण्यात आल्याने राष्ट्रवादीने आक्रमक इशाराही दिला होता. या पार्श्वभूमीवर स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अब्दुल सत्तारांना आठ दिवस कुठल्याच सावर्जनिक ठिकाणी न जाण्याची सूचना केल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान, सध्या अब्दुल सत्तार ‘नॉट रिचेबल’ असून ते आठ दिवस अज्ञातवासात राहू शकतात, असे त्यांच्या निकटवर्तीयांकडून कळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here