शिंदे फडणवीस सरकारच्या रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावर बोलताना ते म्हणाले की, काही विलंब होत नाही. चांगले काम चाललेय. कोठे काम अडलेय का? असा प्रश्न करत गेल्या अडीच वर्षात काहीच कामे होत नव्हती. आता सगळी कामे फटाफट होत आहेत. चांगले काम सुरू आहे, पण तरीही मंत्रिमंडळ विस्तार हिवाळी अधिवेशनाआधी निश्चितपणे लवकरच होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
लोटे एमआयडीसीत प्रदूषण नियंत्रण मंडळाचे ऑफिस इथे नसले तरी आपण पर्यावरण मंत्री असताना दोन अधिकारी इथे कायम ठेवले होते. त्यांना निर्णय घेण्याचे सर्वाधिकार दिले होते. पण नंतर काय झाले मला माहिती नाही. मी प्रत्येक गोष्टीवर टीका करणार नाही, असे सांगत त्यांनी पर्यावरण खाते नंतर आदित्य ठाकरे यांच्याकडे गेले असे अप्रत्यक्षपणे सूचित केले.
कोकणात मुंबई गोवा महामार्गालगत असलेल्या लोटे एमआयडीसीत पोलीस स्टेशनची आवश्यकता आहे. म्हणजे येथे काही होणाऱ्या चोऱ्या आदी गोष्टींवर अंकुश राहिला असता. ही मागणी यापूर्वी आपण केली आहे, पण हा प्रश्न पुन्हा आपण लावून धरू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कोकणातल्या पर्यटन व्यवसायिकांनी काही काळजी करू नये, कोकणातील पर्यटनाचा विकास व्हावा, अशी भूमिका रामदास कदम यांनी मांडली आहे. तर अनिल परब यांची तक्रार रिझवान काझी या आमच्या मुस्लिम कार्यकर्त्यांनी केली आहे. वाळू व्यवसायात हप्ते हवे होते म्हणून ही तक्रार झाल्याचा गंभीर आरोप रामदास कदम यांनी केला. हे सर्व काझी याने समोर येऊन सांगितले आहे असेही कदम यावेळी म्हणाले. आता पुन्हा अनिल परब आणि रामदास कदम यांच्यातील संघर्ष वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.