मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नेते आणि राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना आक्षेपार्ह शब्द वापरत वाद ओढावून घेतला. या वादात आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही उडी घेतली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातून अब्दुल सत्तार यांचा खरपूस शब्दांत समाचार घेण्यात आला आहे. ‘मुख्यमंत्र्यांच्या महानाट्यातील अब्दुल सत्तार, गुलाब पाटलांसारख्या नट मंडळींच्या झोकांड्या जाताना पाहून महाराष्ट्राची सुसंस्कृत रसिक जनता जोडेफेक करू लागली आहे. हे कसले महानाट्य ? हा तर महाराष्ट्राच्या माथी दिल्लीने मारलेला महादळभद्री प्रयोग आहे . या नट मंडळींचा सन्मान म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान, सन्मान नाही. या मंत्र्यांना हाकला, नाहीतर महानाट्याची चौथी घंटा वाजायला लागेल,’ असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला आहे.

अब्दुल सत्तार यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निशाणा साधताना ‘सामना’त टोकदार शब्द वापरण्यात आले आहेत. ‘अब्दुल सत्तार हा काही महाराष्ट्राच्या राजकारणात किंवा समाजकारणात दखल घ्यावी असा माणूस नाही. मराठवाड्यातील सिल्लोडचा हा बेडूक इकडून तिकडे सोयीनुसार उड्या मारतो. सोयीनुसार डराव डरावही करतो. त्याच्या तोंडातून नेहमीच गटाराचा मैला वाहत असतो. महाराष्ट्राच्या संस्कृती आणि परंपरेस ते शोभणारे नाही. या अब्दुल सत्तार यांच्या एका गलिच्छ, बेशरम वक्तव्यामुळे महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व शरद पवार यांच्या सुविद्य कन्या सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना या अब्दुल्लाने आपल्या तोंडाचे गटार असे उघडले की, त्यातून फक्त दुर्गंधीच बाहेर पडली,’ अशी टीका सामना अग्रलेखातून करण्यात आली आहे.

मुंबईकरांनो सावधान! तुमच्या शहराची हवा झालीय खराब; केंद्रीय मंडळ व ‘सफर’ची नोंद

‘पवारांच्या कन्येविषयी बेशरमपणाचे वक्तव्य करताना अब्दुल्लांची जीभ झडली कशी नाही?’

अब्दुल सत्तार यांनी ज्या सुप्रिया सुळे यांच्याविषयी अपशब्द वापरले त्या सुळे यांचे वडील आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कामाविषयीचा उल्लेख करत सामना दैनिकातून अब्दुल सत्तार यांच्याविरोधात हल्लाबोल करण्यात आला आहे. ‘सवित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, राजमाता जिजाऊ अशा महान स्त्रीयांचा वारसा सांगणारे हे महाराष्ट्र राज्य आहे. महिलांना सन्मान व हक्क मिळावेत यासाठी मुख्यमंत्री म्हणून शरद पवार यांनी केलेले योगदान विसरता येणार नाही. त्यांची कन्या व भारतीय संसदेची सदस्या सुप्रिया यांच्याविषयी बेशरमपणाचे वक्तव्य करताना अब्दुल्लांची जीभ झडली कशी नाही?’ असा सवाल ‘सामना’तून उपस्थित करण्यात आला आहे.

मालाडमध्ये एक हजार झाडांची कत्तल, पालिकेची परवानगी न घेताच कुऱ्हाड; पोलिसांकडून गुन्हा दाखल

दरम्यान, महानाट्यवाल्यांचे सरकार सर्वत्र ‘तिसरा’ अंक करत धिंगाणा घालीत सुटले आहे. या धिंगाण्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या कमरेचे सुटले, पण देवेंद्र फडणवीस यांचा अगतिक धृतराष्ट्र का झाला आहे? असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here