बारामती : आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीकोनातून भाजपने आतापासूनच मोर्चेबांधणी करण्यासाठी सुरुवात केली असून बारामती लोकसभा मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रीत केलं आहे. सप्टेंबरनंतर महिन्यात बारामतीच्या दौऱ्यावर आलेल्या भाजप नेत्या आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आता पुन्हा पवार कुटुंबाचा बालेकिल्ला किल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मतदारसंघात येणार आहेत. सीतारामन यांच्या दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल बारामतीत मुक्कामी येणार आहेत. याबाबत भाजप लोकसभा मतदारसंघप्रमुख अविनाश मोटे यांनी माहिती दिली.
दरम्यान, यावेळी प्रल्हाद सिंह पटेल यांच्यासमवेत भाजप आमदार राम शिंदे, गणेश भेगडे, वासुदेव काळे आदी नेते उपस्थित राहणार आहेत. तसंच पटेल हे १२ नोव्हेंबर रोजी इंदापूर, भिगवण, दौंड येथे भेट देणार आहेत. त्यानंतर कौन्सिल हॉल पुणे येथे माध्यमांशी संवाद साधणार असल्याचं अविनाश मोटे यांनी स्पष्ट केलं आहे.