मंगळवारी गुरुनानक जयंतीच्या सुटीनंतर आज भारतीय बाजारपेठा खुल्या आहेत. जागतिक बाजारातील मजबूत तेजीनंतर देशांतर्गत बाजारातील ही तेजी परतली आहे. अमेरिकन बाजारात गेल्या दोन दिवसांत डाऊ जोन्सने सुमारे ७५० अंकांची उसळी घेतली तसेच, नॅस्डॅकने १५० अंकांची वाढ नोंदवली. भविष्यातही बाजारात तेजी दिसून येईल, असे बाजारातील तज्ज्ञांचे मत आहे. प्रदीर्घ काळानंतर परदेशी गुंतवणूकदार पुन्हा एकदा भारतीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर खरेदी करत आहेत.
बुधवारी बाजाराची सुरुवात
आज, बीएसई ३० शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स ११९.१४ अंकांच्या किंवा ०.१९ टक्क्यांच्या वाढीसह ६१,३०४.२९ वर उघडला. याशिवाय एनएसईचा ५० शेअर्सचा निर्देशांक निफ्टी ८५.४५ अंक किंवा ०.४७ टक्क्यांच्या उसळीसह १८,२८८ वर उघडला.
आजचे सेन्सेक्स आणि निफ्टीचे शेअर्स
सुरुवातीच्या मिनिटांतच सेन्सेक्समधील ३० पैकी २० समभाग वाढीसह आणि ५० पैकी ३२ निफ्टी समभाग उडी घेऊन व्यवहार करत आहेत. तर १७ समभाग घसरले आहेत. एका स्टॉकमध्ये कोणताही बदल न होता ट्रेडिंग होत आहे.
आजचे वाढणारे शेअर्स
इंडसइंड बँक, नेस्ले, एचसीएल टेक, आयटीसी, बजाज फिनसर्व्ह, इन्फोसिस, डॉ रेड्डीज लॅबोरेटरीज, कोटक महिंद्रा बँक, एल अँड टी, एम अँड एम, विप्रो, अॅक्सिस बँक, अल्ट्राटेक सिमेंट, मारुती, रिलायन्स इंडस्ट्रीज, एशियन पेंट्स, एसबीआय बँक आणि आयसीआय यांसारख्या समभागात सर्वाधिक वाढ होत आहे.
प्री-ओपनिंगमध्ये मार्केटची वाटचाल
आज बाजाराच्या पूर्व सुरुवातीच्या काळात शेअर बाजार पूर्णपणे सपाट दिसत होता आणि सेन्सेक्स २.७४ अंकांनी वाढून ६१,१८७ च्या पातळीवर दिसत होता. दुसरीकडे, निफ्टी ३१.६५ अंक किंवा ०.१७ टक्क्यांनी वाढून १८,२३४ वर राहिला.