कॅलिफोर्निया: ट्विटरपाठोपाठ दिग्गज सोशल मीडिया कंपनी, फेसबुकही, मोठ्या प्रमाणावर टाळेबंदी करणार आहे. फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपची मूळ कंपनी मेटा प्लॅटफॉर्म्स इंक (Meta Platforms Inc) आजपासून नोकर कपातीची सुरुवात करणार आहे. मेटामध्ये सध्या सुमारे ८७,००० कर्मचारी कार्यरत असून यापैकी दहा टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले जाऊ शकते.

या दरम्यान, कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी काही चुकीच्या निर्णयांमुळे कंपनीची ही अवस्था झाल्याचे म्हटले आणि यासाठी त्यांनी स्वत:ला जबाबदार धरले आहे. फेसबुकची स्थापना २००४ मध्ये झाली आणि त्यानंतर कंपनी पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात टाळेबंदी करणार आहे. करोना काळात कंपनीचा व्यवसाय खूप वाढला होता. गेल्या वर्षी सप्टेंबरपर्यंतच्या आकडेवारीनुसार, कंपनीने एका वर्षात २८ टक्के नवीन भरती केली होती. पण या वर्षी ‘मेटा’चे शेअर्स जवळपास ७३ टक्क्यांनी प्रचंड घसरले आहेत.

Elon Musk यांना उशीरा शहाणपण आलं, आधी अर्ध्या ट्विटर कर्मचाऱ्यांना घरी पाठवलं, आता म्हणतात…
फेसबुकला (आता मेटा प्लॅटफॉर्म) टिकटॉक आणि यूट्यूब सारख्या प्लॅटफॉर्मवरून कोटीची टक्कर मिळत आहे. १८ वर्ष जुन्या कंपनीतून युजर्स टिकटॉक आणि यूट्यूबकडे वळत आहेत, त्यामुळे कंपनीच्या महसुलावर मोठा परिणाम झाला आहे. या वर्षी कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. कंपनीने आधीच नवीन नोकर भरतीवर बंदी घातली होती आणि आता ती मोठ्या प्रमाणात टाळेबंदी करणार आहे.

द वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार झुकरबर्गने मंगळवारी कंपनीच्या अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली. यावेळी त्यांनी कंपनीच्या कारभाराबाबत घेतलेले काही निर्णय योग्य नसून या टाळेबंदीला आपणच जबाबदार असल्याचे सांगितले. कंपनीच्या वाढीचा त्याचा अंदाज अपेक्षेपेक्षा जास्त होता, त्यामुळे कंपनीने आवश्यकतेपेक्षा जास्त भरती केली.

ट्विटरमधून काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना मिळाली आनंदाची बातमी; एकाच वेळी मिळणार अनेक ऑफर्स
झुकरबर्गची एकूण संपत्ती घसरली
मेटा प्लॅटफॉर्ममधील सुमारे १६.८ टक्के शेअर्स झुकरबर्गकडे असून फेसबुकच्या कमाईपैकी ९७ टक्क्यांहून अधिक महसूल जाहिरातींमधून येतो. कंपनीच्या शेअर्सच्या घसरणीमुळे झुकरबर्गच्या एकूण संपत्तीतही मोठी घसरण झाली आहे. एकेकाळी जगातील श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असलेले झुकरबर्ग आता २८ व्या क्रमांकावर घसरले आहेत. त्यांची एकूण संपत्ती यावर्षी ८८.२ अब्ज डॉलरने घसरून ३७.२ अब्ज डॉलरवर राहिली आहे. शेअर्सच्या घसरणीमुळे फेसबुकच्या मार्केट कॅपमध्येही मोठी घसरण झाली आहे. या वर्षात कंपनीचे बाजारमूल्य ५९९ अब्ज डॉलरने घसरले आहे.

Layoffs News: एका झटक्यात कर्मचाऱ्यांनी गमावली नोकरी; वाचा झालं तरी काय
दरम्यान, कंपनीने मे महिन्यातच इंजिनीअर्स आणि डेटा सायंटिस्टची नियुक्ती थांबवली होती. तर जुलैमध्ये झुकरबर्गने कर्मचाऱ्यांना सांगितले की, पुढील १८ ते २४ महिने आव्हानात्मक असू शकतात. त्यानंतर त्यांनी व्यवस्थापकांना कमकुवत कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ओळखण्यास सांगितले. अनेक वर्षांपासून या कंपनीने विक्रमी वाढ नोंदवली आणि गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला. यामुळेच कंपनी वॉल स्ट्रीटची फेव्हरेट राहिली. मात्र यंदा कंपनीचे तिमाही अहवाल चांगले आले नाहीत. फेसबुक देखील आक्रमकपणे आपल्या Metaverse उत्पादनांची जाहिरात करत आहे. त्यामुळे कंपनीच्या आर्थिक स्थितीवरही परिणाम झाला आहे.

इतर कंपन्यांमध्ये टाळेबंदी
दुसरीकडे, यापूर्वी ट्विटरने गेल्या आठवड्यात आपल्या निम्म्या कर्मचाऱ्यांना काढून टाकले होते. भारतात कंपनीने ९० टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते. यासोबतच रायडशेअर कंपनी लिफ्टनेही १३ टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा केली आहे. त्याचप्रमाणे पेमेंट प्रोसेसिंग फर्म, स्ट्राइपने देखील आपल्या १४ टक्के कर्मचार्‍यांना कामावरून कमी करण्याचे सांगितले आहे. दिग्गज ई-कॉमर्स कंपनी ॲमेझॉनने आणि गुगलची मूळ कंपनी अल्फाबेटनेही नवीन भरती थांबवली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here