मुंबई : काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सोमवारी रात्री महाराष्ट्रात पोहोचली. या यात्रेचं नांदेडच्या देगलूरमध्ये उत्साहात स्वागत करण्यात आलं. भारत जोडो यात्रेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे राज्यातील अनेक मोठे नेतेही या यात्रेत सहभागी झाले आहेत. तसंच महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादीचेही काही नेते पदयात्रेत सामील होणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे उद्या होणाऱ्या राहुल गांधी यांच्या जाहीर सभेला उपस्थित राहतील, असं सांगण्यात आलं होतं. मात्र प्रकृतीच्या कारणास्तव उद्या शरद पवार हे जाऊ शकणार नसल्याचं आता त्यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं आहे.

शरद पवार यांच्या प्रकृतीत अद्याप अपेक्षित सुधारणा झाली नसल्याने उद्या ते राहुल गांधी यांच्या जाहीर सभेला उपस्थिती राहू शकणार नाहीत, अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे. स्वत: पवार हे उपस्थित राहू शकणार नसले तरी राष्ट्रवादीचे राज्य पातळीवरील इतर महत्त्वाचे नेते या यात्रेत उद्या सहभागी होतील, असे समजते. यामध्ये सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे यांचा समावेश आहे.

अखेर ठरलं! दिपाली सय्यद शिंदे गटात प्रवेश करणार; तारीखही सांगितली

शरद पवार ११ नोव्हेंबरला पदयात्रेत दिसणार?

राहुल गांधी यांच्या उद्याच्या जाहीर सभेत शरद पवार हे उपस्थित राहू शकणार नसले तरी ते ११ नोव्हेंबर रोजी या यात्रेत सहभागी होतील, असं काँग्रेस नेते आणि पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, उद्या होणाऱ्या जाहीर सभेत राहुल गांधी हे भाजप आणि केंद्र सरकारवर निशाणा साधण्याची शक्यता असून या सभेत ते काय बोलतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here