कोल्हापूर: जिल्ह्यात गेल्या आठ दिवसापासून संसर्गाचा कहर सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर अखेर सोमवारपासून सात दिवसाचा कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. सायंकाळी पालकमंत्री यांनी हा निर्णय जाहीर केला. यामुळे जिल्ह्यात २० ते २६ जुलै या दरम्यान पुन्हा एकदा सर्व व्यवहारांना टाळे लागणार आहे. ( Complete Lockdown In Kolhapur )

वाचा:

पहिल्या टप्यात जिल्ह्यात करोनाचा संसर्ग फारच कमी होता. तीन महिन्यात हा आकडा केवळ चारशे ते पाचशे पर्यंत पोहोचला होता. त्यातील बहुतेक सर्वच रुग्ण बरे होऊन घरी परतत होते. यामुळे कोल्हापूर सुरक्षित असल्याची भावना निर्माण झाली. पण अचानक गेल्या काही दिवसात संसर्ग वाढत गेला. सध्या हा आकडा सतराशेच्या पुढे गेला आहे. गेल्या चार दिवसात सुमारे सहाशे जण करोना बाधित आढळल्याने जिल्ह्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले. आतापर्यंत चाळीस जणांचा यामुळे बळी गेला असून ९३४ जण बरे झाले आहेत. सध्या सहाशेवर रूग्णावर उपचार सुरू आहेत.

वाचा:

चार दिवसात करोनाने हाहाकार माजवल्याने जिल्ह्यात तातडीने लॉकडाऊन जाहीर करण्याची मागणी सुरू होती. पण काहींचा त्याला विरोध होता. नियम कडक करत त्याला रोखण्याची मागणी सुरू होती. लॉकडाऊन पेक्षा सेल्फ लॉकडाऊनचा पर्याय पुढे आला होता. पण करोनाचे रूग्ण वाढत असल्याने अखेर पालकमंत्री सतेज पाटील यांनी सकाळी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत देखील लॉकडाऊन बाबत एकमत झाले नाही. त्यामुळे सायंकाळी पुन्हा बैठक झाली. दिवसभरात करोनाचे २६० रूग्ण सापडल्याने आता लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही असा सूर या बैठकीत उमटला. त्यानुसार मंत्री पाटील यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी चर्चा केली. त्यांनी देखील याला संमती दिली. त्यामुळे शेवटी पालकमंत्र्यांनी सात दिवसाचा कडक लॉकडाऊन जाहीर केला.

वाचा:

येत्या सोमवार पासून या लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. केवळ दूध व औषधाची दुकानेच सुरू राहणार आहे. इतर सर्व व्यवहार बंद राहणार आहे. या काळात कुणीही घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे. पोलिसांना देखील सक्त सूचना देण्यात आल्याने लॉकडाऊनची अंमलबजावणी अधिक कडक होणार असल्याने जिल्ह्यातील सर्व व्यवहारांना पुन्हा एकदा टाळे लागणार आहे.

शुक्रवारी पुन्हा हाहाकार

गेल्या चार दिवसापासून जिल्ह्यात करोना संसर्गाचा हाहाकार सुरू आहे. रोज शंभर ते दिडशे बाधित आढळत आहेत. गेल्या दोन दिवसात तर हा आकडा दोनशेपर्यंत पोहोचला. शुक्रवारी हा आकडा जवळजवळ तीनशेपर्यंत पोहोचला. यामुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण उपचार करण्यासाठी रुग्णालयांची क्षमता कमी आहे. रुग्ण वाढले तर उपचार करण्यात अडचणी येणार आहेत. त्यामुळे लॉकडाऊन जाहीर करून समूह संसर्गाचा धोका कमी करण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला आहे.

कोल्हापुरातील करोनाची सद्यस्थिती

करोना बाधित रुग्ण १८३९
उपचार करून घरी परत ९३४
अॅक्टिव्ह रुग्ण ८७५
आतापर्यंत मृत्यू ४०
आज सापडलेले रुग्ण २७६

दरम्यान, राज्यातील अनेक जिल्ह्यांत व शहरांवर पुन्हा लॉकडाऊनचे संकट ओढवले आहे. ठाणे, कल्याण डोंंबिवली, पुणे, पिंपरी चिंचवड या पालिका हद्दींत सध्या लॉकडाऊन सुरू आहे. औरंगाबाद व जालना जिल्ह्यांतही लॉकडाऊनची वेळ आली आहे. त्यानंतर आता कोल्हापूरचा नंबर लागला आहे. या पुन:श्च लॉकडाऊनमुळे सर्वत्र चिंतेची लकेर दिसू लागली आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here