रिक्षा चालक म्हणून काम करणारे अनुप गेल्या १० वर्षांपासून लॉटरीची तिकिटं खरेदी करत आहेत. याआधी त्यांनी लहानसहान रकमेच्या लॉटरी जिंकल्या. सप्टेंबरमध्ये अनुप २५ कोटी रुपयांची लॉटरी जिंकले. तेव्हापासून अनुप यांचं आयुष्य बदललं. अनुप तिरुअनंतपुरमचे रहिवासी आहेत.
लॉटरी जिंकल्यानंतर लोकांचा दृष्टीकोन बदलला. त्यांचं वागणं बदललं. लॉटरी लागल्यावर शेकडो लोक भेटायला आले. सकाळी झोपेतून उठून घराबाहेर पडायचो, तर मोठी रांग लागलेली असायची. पहाटे ५ पासून लोक भेटायला यायचे. त्यांना आर्थिक मदत हवी असायची, असं अनुप यांनी सांगितलं.
लॉटरी जिंकल्यानंतर अनुप यांच्याशी अनेक माध्यमांच्या प्रतिनिधींनी संपर्क साधला. त्यांची मुलाखत घेतली. जिंकलेल्या पैशातून लोकांची मदत करण्याचा विचार करत असल्याचं अनुप यांच्या पत्नी माया यांनी एका स्थानिक वृत्तवाहिनीशी संवाद साधताना म्हटलं. त्यानंतर अनुप यांच्या घराजवळ गर्दी झाली. कर्जफेडीसाठी, लग्नासाठी मदत करण्याचं गाऱ्हाणं अनेकांनी अनुप यांच्याकडे मांडलं. एक व्यक्ती तर रॉयल एनफिल्ड घेऊन द्या अशी मागणी करत दिवसभर घरात ठाण मांडून होता, अशी माहिती अनुप यांनी दिली.