बारणेंच्या बंडखोरीचा बदला घेण्यासाठी मावळमध्ये उद्धव ठाकरेंनी आव्हान उभं केलंय आणि मावळ गाजवणारा ठाकरेंचा कट्टर शिवसैनिक उभा केला आहे. आधी शेती, नंतर बांधकाम व्यवसायात उतरलेले बारणे १९९७ ला नगरसेवक झाले, इथूनच राजकीय कारकिर्दीचा प्रारंभ झाला. १९९७ ते २०१२ या काळात पिंपरी चिंचवड महापालिकेत स्थायी समिती अध्यक्ष, विरोधी पक्षनेता अशी पदंही भूषवली. पिंपरी चिंचवड आणि पुढे जिल्ह्यात शिवसेना वाढवण्यामध्ये श्रीरंग बारणे यांचा मोठा वाटा आहे. याचंच बक्षिस म्हणून २०१४ ला बारणेंना खासदारकीचं तिकीट मिळालं. मावळचे तत्कालीन खासदार गजानन बाबर यांचं तिकीट कापून श्रीरंग बारणे यांना संधी मिळाली. २०१४ ला बारणेंनी राष्ट्रवादी आणि शेकाप उमेदवाराचा पराभव करत शिवसेनेचा भगवा मावळावर फडकवला. बारणे यांची घोडदौड सुरूच होती. या कालावधीत संसदरत्न पुरस्कारानेही त्यांना गौरवण्यात आलं.

श्रीरंग बारणे

पुढे २०१९ ची निवडणूक आली. भाजप शिवसेनेची युती होती. मावळ मतदार संघावर संपूर्ण राज्यातच नव्हे तर देशाचं लक्ष होतं. कारण या मतदारसंघात लढणाऱ्या नावांपैकी एक नाव घेतलं जात होतं ते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचं. मात्र या ठिकाणी राष्ट्रवादीने अजित पवार यांचे मोठे पुत्र पार्थ पवार यांना उमेदवारी दिली आणि श्रीरंग बारणे यांच्यासमोर त्यांच्या आयुष्यातील सर्वात तगडा उमेदवार मिळाला. बारणे यांचं मुळात रक्त शिवसेनेचं. या आव्हानाला बारणेंनी अगदी छोटं समजलं आणि हुंकार भरली.

मावळवर पुन्हा एकदा भगवा फडकवला

उद्धव ठाकरे यांनी टाकलेला विश्वास बारणेंनी सार्थ करत पवारांना धूळ चारत मावळवर पुन्हा एकदा भगवा फडकवला. पुढे राज्यात २०१९ ला विधानसभा निवडणुकीनंतर मोठ नाट्य घडलं आणि महाविकास आघाडी अस्तित्वात आली. ठाकरेंनी ज्या पवारांच्या विरोधात लढण्याचे आदेश दिले त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसण्याची वेळ आली. पवार घराण्याला पहिल्या पराभवाची धूळ चालणाऱ्या बारणेंनी ठाकरेंचा हाही आदेश मान्य केला आणि काम चालूच ठेवलं. पुढे एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि बारणेंनी शिंदेंचा हात पकडत ठाकरेंना सोडचिठ्ठी दिली.

युवा मावळ्याला ताकद दिली

बंडखोरीनंतरही मावळ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे हे ठाकरेंना दाखवून द्यायचं होतं. ज्या बारणेंनी पवार घराण्याला पराभवाची धूळ चारली त्या बारणेंसमोर उद्धव ठाकरे यांनी मावळात एका युवा मावळ्याला ताकद दिली आणि बारणेंसमोर मोठ आव्हान उभा करण्याचं ठरवलंय. या मावळ्याचं नाव आहे अनिकेत अनंत घुले. अनिकेत घुले हे देखील मूळचे मावळचे. आधी मनसे आणि नंतर शिवसेनेत आपली राजकीय कारकीर्द सुरू झाली. आदित्य ठाकरे यांच्या जवळचा आणि विश्वासातील कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख.

शिवभक्त, शिवसैनिक म्हणून ओळख

अनिकेत घुले यांची ओळख शिवसैनिक अशी आहेच, याशिवाय शिवभक्त म्हणूनही त्याची ओळख आहे. एका हाकेवर हजारो युवकांची फौज जमा करण्याची ताकद असलेल्या अनिकेतच्या याच ताकतीला ठाकरेंनी हेरलं आणि घुलेंवर मिशन मावळची जबाबदारी सोपवली. अनिकेत घुले हे सध्या युवा सेनेचे जिल्हाप्रमुख आहेत. तगडा जनसंपर्क आणि आक्रमक वक्तृत्व या घुलेंच्या जमेच्या बाजू आहेत. दहावी शिकलेले अनिकेत घुले हे श्रीरंग बारणे यांच्या प्रचारात सर्वात पुढे होते.

घुलेंना ताकद देण्याचं ठाकरेंनी ठरवलं

मावळचा खडा न खडा माहित असलेला आणि तगडा जनसंपर्क असलेला सामान्य कार्यकर्ता उद्धव ठाकरेंनी हेरला आणि घुलेंना ताकद देण्याचं ठाकरेंनी ठरवलं. ज्यावेळेस श्रीरंग बारणे यांनी साथ सोडली त्यावेळेस अनिकेत घुले यांना देखील शिंदे गटात जाण्याचा मार्ग मोकळा होता. मात्र शिवसेनेवर असलेलं प्रेम आणि उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या प्रति असलेली निष्ठा यामुळे अनिकेत घुले यांनी ठाकरे गटातच राहण्यास पसंती दिली. बारणेंनी साथ सोडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मावळमधील शिवसैनिकांची एक बैठक मातोश्रीवर बोलवली.

ठाकरेंचाच भगवा फडकण्याची शपथ

या बैठकीत काही मोजके नेते आणि शिवसैनिक उपस्थित होते. त्यातील पहिल्या रांगेत बसले होते अनिकेत घुले. त्याच दिवशी बाळासाहेब ठाकरे यांच्या सिंहासनाचा आशीर्वाद घेऊन मावळात ठाकरेंचाच भगवा फडकण्याची शपथ घेऊन अनिकेत घुले मावळात परतले आणि पक्ष वाढीच्या कामाला लागले. मावळ लोकसभा मतदारसंघात युवकांचं संघटन करुन शिवसेनेची बांधणी गावागावात करण्यावर अनिकेत घुले भर देत आहेत.

अनिकेत घुले

आदित्य ठाकरेंनी तळेगावात वेदांत फॉक्सकॉन कंपनी गुजरातल्या गेल्याच्या निषेधार्थ आंदोलन केलं. त्यासाठीही अनिकेत घुले यांनी प्रचंड गर्दी जमवली. युवा शिवसैनिकांमध्ये अनिकेत घुले लोकप्रिय आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यावेळेस शिवसेना उभारली त्यावेळेस असेच विचाराने एकत्र झालेले सामान्य घरातील मुलं आमदार खासदार ते थेट मंत्री पदापर्यंत पोहोचले. आता ती वेळ उद्धव ठाकरे यांच्यावर आहे. शिवाय अनिकेत घुलेंसारख्या सामान्य घरातील कार्यकर्ते सुद्धा अतिशय ताकतीने तगड्या प्रतिस्पर्ध्यासमोर आव्हान उभं करत आहेत.

VIDEO: बारणेंचा हिशोब चुकता करण्यासाठी ठाकरेंनी शिवभक्त उतरवला

बारणेंचा हिशोब चुकता करण्यासाठी ठाकरेंनी शिवभक्त उतरवला, शिवसैनिकांची फौज उभी करणारा युवा नेता मैदानात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here