मुंबई: टी-२० विश्वचषक स्पर्धेत उद्या होणाऱ्या उपांत्य फेरीत भारताचा सामना इंग्लंडशी होईल. भारतीय संघाचा सराव सुरू आहे. मात्र या सरावादरम्यान भारतीय खेळाडू दुखापतग्रस्त होत असल्यानं चिंता वाढली आहे. कर्णधार रोहित शर्मा काल थ्रो डाऊनचा सराव करताना दुखापतग्रस्त झाला. त्यानंतर आज विराट कोहलीला दुखापत झाली. सरावादरम्यान त्याला चेंडू लागला. वेदनेनं कळवळलेला विराट नेट्समध्ये गुडघ्यावर बसला. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

उद्या ऍडलेडवर भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना रंगेल. याच सामन्यासाठी विराट कोहली मैदानात सराव करत होता. या दरम्यान हर्षल पटेलनं टाकलेला चेंडू कोहलीला लागला. चेंडू जोरात लागल्यानं कोहली वेदनेनं कळवळला आणि गुडघ्यावर बसला. विराटला दुखापत झाल्यानं टीम इंडियाच्या गोटात चिंतेचं वातावरण होतं. कारण सध्या कोहली जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. सामन्याचा निकाल बदलण्याची ताकद त्यानं अनेकदा दाखवून दिली आहे. कोहली जुन्या फॉर्ममध्ये परतल्यानं भारताला मोठा दिलासा मिळाला आहे.
VIDEO: फिल्डिंगसाठी बदनाम पाकिस्तानला हे कसं जमलं? शादाबचा रॉकेट थ्रो पाहून विश्वास बसणार नाही
विराट कोहलीची दुखापत जास्त गंभीर नाही. सरावादरम्यान चेंडू लागल्यावर कोहली काही वेळ खाली बसला. मात्र स्वत:ला सावरत तो पुन्हा उभा राहिला. त्यानं सरावाला सुरुवात केली. यानंतर त्यानं चाहत्यासोबत सेल्फीदेखील काढला. त्यामुळे टीम इंडियानं सुटकेचा निश्वास सोडला. कोहली उद्या इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे. या स्पर्धेत कोहलीनं दमदार कामगिरी केली आहे. जुन्या फॉर्ममध्ये परतलेला कोहली गोलंदाजांची अक्षरश: पिसं काढत आहे.

टी-२० विश्वचषक स्पर्धेत विराट कोहली जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. स्पर्धेत सर्वाधिक धावा कोहलीच्या नावावर आहेत. सुपर १२ राऊंडमध्ये कोहलीनं ५ सामन्यांत १२३ च्या सरासरीनं आणि १३८.९८ च्या स्ट्राईक रेटनं २४६ धावा केल्या आहेत. भारतीय संघानं अगदी आरामात उपांत्य फेरी गाठली. टीम इंडियाच्या वाटचालीत कोहलीचा मोठा वाटा आहे. या स्पर्धेत कोहलीनं तीन अर्धशतकं झळकावली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here