मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना काल विशेष पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केला आणि तब्बल १०२ दिवसांनंतर राऊत तुरुंगातून बाहेर आले. ठाकरेंचे कट्टर समर्थक आणि पक्षाची मुलुखमैदानी तोफ अशी ओळख असलेल्या राऊत यांच्या सुटकेने राज्यभरातील शिवसैनिकांनी जल्लोष केला. तुरुंगाबाहेर पडताच शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून संजय राऊतांचं आतषबाजीसह स्वागत करण्यात आलं. जवळपास साडेतीन महिन्यांनंतर तुरुंगातून बाहेर आलेल्या राऊत यांनी पहिल्याच दिवशी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला. त्यामुळे राऊत हे ज्या दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक आहे त्या ‘सामना’च्या अग्रलेखातूनही सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला जाईल, असं बोललं जात होतं. मात्र पहिल्याच दिवशी सामना अग्रलेखातून या घडामोडींवर भाष्य करण्याचं टाळण्यात आलं आहे. याबाबत कदाचित उद्याच्या अग्रलेखातून भूमिका मांडली जाण्याची शक्यता आहे.

सामनाच्या आजच्या अग्रलेखात नोटबंदीचा निर्णय आणि त्याचे अर्थव्यवस्थेवर झालेले विपरीत परिणाम यावरून मोदी सरकारला घेरण्यात आलं आहे. नोटबंदीच्या निर्णयाला ८ नोव्हेंबर रोजी सहा वर्ष पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर सामनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समाचार घेण्यात आला आहे. ‘नोटाबंदीमुळे ना सरकारच्या अपेक्षेप्रमाणे काळा पैसा नष्ट झाला ना बनावट नोटांचा सुळसुळाट पूर्ण थांबला. डिजिटल, कॅशलेस व्यवहार यात मोठी वाढ झाली, पण रोख व्यवहारांचे प्रमाण मागील पानावरून पुढे तसेच सुरू आहे,’ अशी टीका करण्यात आली आहे.

प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा; नीरव मोदींची याचिका न्यायालयाने फेटाळली

सामना आणि संजय राऊत

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक म्हणून संजय राऊत हे गेल्या अनेक वर्षांपासून काम पाहात आहेत. आपल्या धारदार लेखणीतून राऊत हे नेहमीच शिवसेनेच्या राजकीय विरोधकांवर हल्लाबोल करत असतात. मात्र ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटकेची कारवाई केल्यापासून शिवसेनेची ही धडाडती तोफ शांत झाली होती. आता पुन्हा एकदा राऊत तुरुंगाबाहेर आल्याने सामनातील शब्दांची धारही आणखी टोकदार होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात संजय राऊत यांना जामीन मंजूर करताना विशेष पीएमएलए कोर्टाने अत्यंत गंभीर निरीक्षणे नोंदवत ईडीला फटकारले आहे. ‘पत्राचाळ घोटाळ्याच्या प्रकरणात म्हाडाच्या भूमिकेबद्दलही संशय व्यक्त करून ईडीने म्हाडाच्या कोणत्याच कर्मचाऱ्याला आरोपी केले नाही. शिवाय कथित घोटाळ्यातील मुख्य आरोपी राकेश व सारंग वाधवान यांना ईडीने अटकच केली नाही. त्यांना मोकाट सोडले. त्याच प्रकरणात स्पष्टपणे दिवाणी वादाचे स्वरुप असूनही त्या प्रकरणाला मनी लाँड्रिंग प्रकरणाचा शिक्का लावून ईडीने प्रवीण राऊत यांना अटक केली आणि संजय राऊत यांना तर कोणत्याही कारणाविना अटक केल्याचे दिसते,’ असं निरीक्षण न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांनी आपल्या आदेशात नोंदवलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here