पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्वेता रानवडे व प्रतीक ढमाले यांच्यामध्ये ५ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोन्ही कुटुंबीयांनी त्यांच्या लग्नास मान्यता दिली होती. मात्र, गेल्या वर्षापासून प्रतीक हा श्वेतावर संशय घेऊन त्रास देऊ लागला होता. कोणत्याही कारणावरून संशय घ्यायचा. प्रतीक याची वर्तणूक अचानक बदलल्यानंतर श्वेताने होणाऱ्या लग्नाला नकार दिला. याप्रकरणी प्रतीकचे वडील व प्रतिकचा मित्र तिला वारंवार धमकी देत तिच्यावर लग्न करण्यासाठी दबाव टाकत होते. मात्र, श्वेता घेतलेल्या निर्णयावर ठाम होती. मात्र, हा निर्णय प्रतिकला आवडला नाही म्हणून त्याने श्वेताची निर्घृणपणे हत्या केली.
श्वेता बुधवारी आपल्या आई सोबत बाजारात गेली होती. घरी परतत असताना पार्किंगमध्ये प्रतीक तिची वाट पाहत होता. प्रतीकने तिला पार्किंगमध्ये गाठत तिच्या शरीरावर ठिकठिकाणी धारदार शस्त्राने सपासप वार करत तिथून पसार झाला. श्वेता गंभीर जखमी झाली असता तिला रुग्णालयात नेतांना तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली असून मुलींमध्ये भीतीच वातावरण पाहायला मिळत आहे.