मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना काल पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर त्यांची तुरुंगातून सुटका झाली. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने अटक केल्यानंतर तब्बल १०२ दिवसानंतर राऊत यांची सुटका झाली. तुरुंगातून बाहेर पडताच शिवसैनिकांनी संजय राऊत यांचं जल्लोषात स्वागत केलं. त्यानंतर राऊत यांनी सिद्धीविनायक मंदिर येथे दर्शन घेतलं आणि नंतर शिवाजी पार्क येथे शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्यासाठी सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

संजय राऊत आणि शरद पवार यांच्यातील राजकीय जवळीक सर्वश्रृत आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपसोबतची युती तोडून शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जात महाविकास आघाडी केली. राज्यातील या ऐतिहासिक प्रयोगाचे शिल्पकारही पवार आणि राऊत हेच दोन नेते होते. राऊत यांनी त्यावेळी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यातील दुवा म्हणून काम केलं आणि अशक्य वाटणारी राजकीय युती घडवून आणली. राज्यात महाविकास आघाडीचं सरकारही स्थापन झालं. मात्र काही महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना आव्हान देत ४० आमदारांसह सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि अडीच वर्ष चाललेलं महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर राऊत यांच्यावरही मनी लॉन्ड्रिंगचा आरोप झाल्यानंतर ईडीकडून अटकेची कारवाई झाली.

Sanjay Raut: भाजप संजय राऊतांना पुन्हा घेरण्याच्या तयारीत? फडणवीसांचा खास माणूस पुन्हा सक्रिय

संजय राऊत यांच्या अटकेनंतर शरद पवार यांनी काही दिवस जाहीर भूमिका न घेतल्याने राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लढवले जात होते. मात्र या दोन नेत्यांमधील मैत्रीचा धागा घट्ट असल्यानेच आज तुरुंगातून सुटका झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी संजय राऊत हे पवार यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाणार असल्याचे समजते.

दरम्यान, शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर संजय राऊत हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मातोश्री निवासस्थानी जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here