२८ ऑक्टोबर रोजी ट्विटर खरेदीचा करार पूर्ण झाल्याची अधिकृत घोषणा केल्यापासून कंपनीचे नवे मालक एलन मस्कने नुकतेच ट्विटरच्या निम्मे कर्मचारी काढून टाकले. पण टाळेबंदीच्या काही तासांनंतर, कंपनीने काही महत्त्वाच्या कर्मचार्यांना चुकून काढून टाकले आणि ते त्यांना कायम ठेवणार असल्याचे वृत्त समोर आले. पण बर्याच माजी कर्मचारी पुन्हा कंपनीत काम करण्यास स्वारस्य नाही असे एका नवीन अहवालात सूचित केले आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण
टेकओव्हरसोबतच मस्कने ट्विटरमध्ये मोठ्या संख्येने कर्मचारी कपात केली. यामुळे कंपनीच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता होती. यानंतर व्यवस्थापन अनेक कर्मचाऱ्यांना चुकून कामावरून काढून टाकल्याचे सांगत परत बोलावत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. या निर्णयामुळे अनेक कर्मचाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे.
मस्क यांनी ट्विटरची धुरा आपल्या हाती घेतल्यापासून कंपनीमध्ये काम करण्याच्या पद्धतींबाबत सतत चर्चा होत असताना कर्मचारी कामाच्या दडपणात बुडालेले आहेत. एकही रजा न घेता कर्मचारी २०-२० तास काम करत असल्याची माहिती आहे. अशी अनेक छायाचित्रेही व्हायरल झाली आहेत ज्यात कर्मचारी कार्यालयातच झोपलेले दिसत आहेत. अशी बातमी मिळाल्याने परतीसाठी कंपनीचे फोन आलेले असे कर्मचारी कोंडीत अडकले आहेत. मस्कची वृत्ती, कामाची परिस्थिती आणि अनिश्चितता यामुळे कर्मचारी ट्विटरवर परतण्यास नाखूष आहेत.
सर्वात मोठी डोकेदुखी काय
मात्र, या कर्मचार्यांची सर्वात मोठी चिंता ही आहे की त्यांनी ही ऑफर नाकारल्यास, नोकरीवरून काढून टाकल्यास मिळणारे फायदे ते गमावू शकतात. अशा परिस्थितीत, जर ते परत नोकरीवर रुजू झाले नाहीत तर कंपनी त्यांना थेट काढून टाकू शकते. असे झाल्यास कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांचा पगार व इतर लाभ मिळणार नाही.
नोकरी गमावलेल्या कर्मचाऱ्यांना २ महिन्यांचा पगार आणि एक महिन्याची भरपाई देण्यात आली आहे. म्हणजेच नोकरीत रुजू झाल्यास त्यांच्यावर कामाचा बोजा पडणार तर त्यांनी नकार दिला तर त्यांना नुकसान भरपाई मिळणार नाही, म्हणजेच अशा कर्मचाऱ्यांचे दोन्ही बाजूंनी नुकसान निश्चित आहे.