Agriculture News in Chandrapur : चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यासह पूर्व विदर्भात आणि तेलंगणा, आंध्र प्रदेशात मोठ्या प्रमाणात मिरचीचं पीक (Chilli crop) घेतलं जातं. मात्र, इंडोनेशियावरुन आलेल्या ब्लॅक थ्रीप किडीमुळं (Black thrips) मिरची पिकाचं मोठं प्रमाणात नुकसान होतं. कोणत्याच रासायनिक आणि सेंद्रिय उपायांना दाद न देणाऱ्या या किडीवर चंद्रपूर जिल्ह्यातील एका तरुण शेतकऱ्याने अतिशय स्वस्त आणि प्रभावी उपाय शोधून काढला आहे. राजुरा तालुक्यातील पंचाळा इथं राहणाऱ्या सतीश गिरसावळे (Satish Girsawle) या तरुण शेतकऱ्याने आपल्या निरीक्षणातून या किडींचा नायनाट करण्यासाठी एक भन्नाट आयडिया शोधून काढली आहे. त्यानं सौरऊर्जेवर चालणारं यंत्र तयार केलं आहे. हे यंत्र शेतकऱ्यांसाठी मोठं वरदान ठरले आहे. 

ब्लॅक थ्रीप हा निळ्या रंगाकडे आकृष्ट होतो

मागील वर्षी  इंडोनेशियावरुन आलेल्या ब्लॅक थ्रीप किडीमुळं महाराष्ट्रासह तेलंगणातील मिरची पिकाचं मोठं नुकसान झालं. त्यासोबतच राजूरा तालुक्यातील मिरची पिकाचे देखील मोठं नुकसान झालं. मात्र, ब्लॅक थ्रीपला रोखण्यासाठी कोणत्याही प्रकारचे रासायनिक किंवा सेंद्रीय औषधांचे उपाय आपल्याकडे नव्हते. त्यामुळं यावर उपाय शोधत असताना आमच्या लक्षात आलं की, ब्लॅक थ्रीप हा निळ्या रंगाकडे आकृष्ट होतो हे आमच्या लक्षात आलं. त्यानंतर आम्ही कृषक स्वराज शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून यावरती काही ट्रायल केल्या. यावरती निळा प्रकाश सापळा तयार केल्याची माहिती शेतकरी सतीश गिरसावळे यांनी दिली.

शेतकरी मोठा औषधांवरचा खर्च वाचू शकतो

निळा प्रकाश सापळा हा घरी असलेल्या वस्तुपासून तयार करता येतो. एका तेलाच्या पिपांमध्ये प्रकाश सापळा बनवला आहे. यामध्ये आपोआप लाईट चालू आणि बंद करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. हा पूर्णपणे स्वयंचलित आहे. रात्री ब्लॅक थ्रीप हा निळ्या रंगाकडे आकृष्ट होतो आणि साठलेल्या पाण्यात पडतो. त्यामुळं ब्लॅक थ्रीपचं मोठ्या प्रमाणावर नियंत्रण करता येत असल्याची माहिती शेतकरी सतीश गिरसावळे यांनी दिली. याच्या वापरातून शेतकरी मोठा औषधांवरचा खर्च वाचू शकतो असेही त्यांनी सांगितलं.

विदर्भात मिरची हे हुकमी एक्का असलेलं नगदी पीक

धान, सोयाबीन किंवा कपाशीसारखी पीक घेणाऱ्या विदर्भात मिरची हे हुकमी एक्का असलेलं नगदी पीक आहे. त्यामुळं चंद्रपूर जिल्ह्यासह विदर्भ आणि तेलंगणाच्या सीमावर्ती भागात मिरची पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. सध्या मिरची पिक फुलाच्या स्थितीत आहे. गेली काही वर्षे विविध प्रकारचे परदेशी वाण वापरल्यानं मिरची रोपांच्या फुलावर किडीचा मोठा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यातही इंडोनेशियावरुन आलेल्या ब्लॅक थ्रीप किडीमुळं तर शेतकरी पुरते हैराण झाले आहे. या शत्रू किडींचा नयनाट करण्यासाठी शेतकऱ्यांकडे सध्या कुठल्याही प्रकारचे रासायनिक वा सेंद्रिय अस्त्र उपलब्ध नाही. परिणामी मिरची पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात बाधित होते. याच समस्येचा मागोवा घेत असताना सतीश गिरसावळे या तरुण शेतकऱ्याने आपल्या निरीक्षणातून या किडींचा नायनाट करण्यासाठी निळा प्रकाश सापळा आयडिया शोधून काढली.

हे यंत्र शेतकऱ्यांसाठी अल्प किंमतीत मोठं वरदान

सौरऊर्जेवर चालणारे हे यंत्र शेतकऱ्यांसाठी अल्प किंमतीत मोठे वरदान ठरले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील आणि तेलंगणा राज्यातील सीमावर्ती भागात सध्या मिरची पिकातील फुल किडीचा बंदोबस्त करण्यासाठी ही आयडिया हिट ठरली आहे. संध्याकाळी सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत सौर ऊर्जेवर चालणारे हे साधे-सोपे उपकरण शेतकऱ्यांच्या पसंतीला उतरले आहे. विविध शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन हा युवा संशोधक शेतकरी व त्याची टीम याचे प्रात्यक्षिक देत शेतकऱ्यांना याबाबत जागृत करत आहे.

एकात्मिक कीड व्यवस्थापन ही शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब

एकात्मिक कीड व्यवस्थापन ही शेतकऱ्यांसाठी नेहमीची चिंतेची बाब ठरली आहे. अशा स्थितीत स्थानिक समस्यांसाठी स्थानिक उपायांचा अवलंब केल्यास आणि पारंपारिक ज्ञानाला आधुनिकतेची जोड दिल्यास यातून उत्पादन वाढीचे आशादायक चित्र निर्माण होऊ शकते. युवा संशोधकांच्या या सर्व प्रयत्नांना मात्र, सर्वच स्तरातून बळ देण्याची गरज आहे. 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here