मुंबई :उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत हे जवळपास साडेतीन महिन्यांनंतर तुरुंगातून बाहेर आले आहेत. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात विशेष पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर राऊत यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरून दूर करत राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यापासून तुरुंगात असलेले संजय राऊत हे बाहेर आल्यानंतर या सरकारचा खरपूस समाचार घेतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र राऊत यांनी पहिल्या दिवशी तरी सरकारवर हल्लाबोल करणं टाळलं आहे. तसंच शिवसेनेतील फुटीनंतर संजय राऊत ज्या भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका करत होते, त्याच फडणवीसांवर राऊत यांनी आता मात्र स्तुतीसुमने उधळल्याचं दिसत आहे.

‘महाराष्ट्रात एक नवीन सरकार स्थापन झालं आहे. मी मागील तीन महिन्यांपासून बाहेर होतो. या सरकारने काही चांगले निर्णयही घेतले आहेत. मी त्यांचं स्वागतही करतो. फक्त विरोधासाठी विरोध आम्ही कधी करणार नाही. ज्या गोष्टी राज्यासाठी, देशासाठी आणि इथल्या लोकांसाठी चांगल्या असतात त्यांचं नेहमी स्वागतच केलं पाहिजे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही चांगले निर्णय घेतले आहेत. विशेषत: गरिबांना घरे देण्याचा निर्णय असेल किंवा म्हाडाचे अधिकार काढून घेण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला होता, जे मला चांगलं वाटत नव्हतं, आता पुन्हा म्हाडाला अधिकार देण्याचा निर्णय फडणवीस साहेबांनी घेतला आहे, हे चांगेल निर्णय आहेत,’ असं म्हणत संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं आहे.

तीन महिन्यांनी हातात घड्याळ बांधलंय, पण आता ते सैल होतंय: संजय राऊत

एकीकडे, राज्य सरकारच्या कामाचं कौतुक करत असताना संजय राऊत यांनी राजकीय सूडबुद्धीतून आपल्यावर कारवाई झाल्याचं म्हटलं आहे. ‘मी ईडीविरोधात किंवा ज्यांनी हा सगळा कट रचला होता, त्यांच्याबद्दल बोलू इच्छित नाही. या सगळ्यातून त्यांना आनंद मिळाला असेल तर मी त्यांच्या आनंदात सहभागी आहे. जे आम्हाला आणि आमच्या पक्षाला भोगायचं होतं, ते आम्ही भोगलं आहे. माझ्या कुटुंबानेही या सगळ्या काळात खूप काही गमावलं आहे. आपल्या देशाने सूडबुद्धीने चालणारं असं राजकारण याआधी कधी पाहिलं नव्हतं. आपला देश १५० वर्ष गुमागिरीत होता, मात्र त्या काळातही असं राजकारण करण्यात आलं नव्हतं. मात्र तरीही मी जे झालं त्याचा स्वीकार करतो. मी सगळ्या यंत्रणेला किंवा केंद्रीय तपास यंत्रणांना दोष देणार नाही. चांगलं काम करण्याची संधी त्यांनाही मिळते, त्यांनी ते केलं पाहिजे,’ असं राऊत यांनी म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here