मुंबई: मी आज तीन महिन्यांनी हातात घड्याळ बांधले आहे. जेलमध्ये असताना घड्याळ घालता येत नव्हते. आता मी हातात घड्याळ घातलंय, पण ते सैल होत आहे. तुरुंगात राहणे वाटतं तेवढं सोपं नाही, असे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले. जेलमध्ये राहणे चांगले नसते. जेलमध्ये लोकं मजेत राहतात, असं अनेकांना वाटते. पण प्रत्यक्षात जेलमध्ये राहणे खूप कठीण आहे. त्यामुळेच तुरुंगाची संकल्पना अस्तित्त्वात आली असावी, असे संजय राऊत यांनी म्हटले. ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी संजय राऊत यांना जेलमधील अनुभवाविषयी विचारण्यात आले. तेव्हा राऊत म्हणाले की, तो अनुभव इतक्यात सांगण्यासारखा नाही. मध्यंतरी आमचे मित्र मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी एका भाषणात सांगितलं होतं की, संजय राऊत यांना ईडीकडून अटक होईल. त्यांनी एकांतात बोलण्याची प्रॅक्टिस करावी. हो मला ईडीने अटक केली, पण न्यायालयाने ती बेकायदेशीर ठरवली. पण राजकारणात शत्रूबाबत जेलमध्ये जाण्याची भावना कोणीही व्यक्त करु नये. स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक हेदेखील तुरुंगातील एकांतात होते. मी तुरुंगातील एकातांचा सदुपयोग करुन घेतला आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.

मी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर लोकांनी माझं स्वागत केले. मला वाटलं होतं, लोकं मला विसरतील. पण मी आज सकाळपासून पाहतोय, लोक मला फोन करत आहेत. उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी मला फोन केला होता. शरद पवार यांना मझी खूप काळजी आहे. त्यामुळे मी आता त्यांना जाऊन भेटणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले.

राज्याचा कारभार देवेंद्र फडणवीस हेच चालवतायेत; पहिल्याच पत्रकारपरिषदेत संजय राऊतांची ‘गुगली’

ईडी किंवा अन्य कोणाविषयी माझ्या मनात कटुता नाही, मला भोगायचं ते मी भोगलंय: संजय राऊत

काल न्यायालयाने ज्या प्रकारचा निकाल दिला त्यामुळे देशात चांगले वातावरण तयार झाले आहे. मला ईडी किंवा अन्य कोणाविषयीही बोलायचे नाही. त्यांनी कारस्थान रचलं असेल, त्यामध्ये त्यांना आनंद मिळाला असेल तर मी त्यांच्या आनंदात सहभागी आहे. माझ्या मनात कोणाविषयीही तक्रार नाही. मी आणि माझ्या पक्षाने जे भोगायचं होतं, ते भोगलं आहे. माझ्या कुटुंबाने खूप काही गमावले आहे. पण मी या गोष्टींचा स्वीकार करतो, अशा गोष्टी आयुष्यात घडतात. पण आजपर्यंतच्या इतिहासात देशाने अशाप्रकारचे सूडबुद्धीचे राजकारण कधी पाहिले नाही. आपल्या देशात दुश्मनांनाही चांगल्या पद्धतीने वागवलं जातं. तरीही मी या सगळ्याचा स्वीकार करतो. मी ईडी किंवा कोणत्या यंत्रणेला दोष देणार नाही. प्रत्येकाला चांगलं काम करण्याची संधी मिळते, त्यांनी चांगलं काम करावं, असे संजय राऊत यांनी म्हटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here