गेल्या आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सनं जेतेपद पटकावलं. कर्णधार म्हणून हार्दिक पांड्याची ती पहिलीच आयपीएल स्पर्धा होती. पहिल्याच संधीचं हार्दिकनं सोनं केलं. त्यामुळे त्याच्याकडे पुढील कर्णधार म्हणून पाहिलं जाऊ शकतं. त्याला कर्णधार होण्याची निश्चित संधी आहे, असं गावसकर म्हणाले.
संघात अनेक बदल होऊ शकतात. काही जण निवृत्ती स्वीकारू शकतात. संघात असे काही खेळाडू आहेत, ज्यांचं वय ३५ च्या आसपास आहे. त्यांचा फॉर्म पाहता त्यांच्या संघातील स्थानाचा पुर्नविचार होऊ शकतो, असं गावसकर म्हणाले. इंग्लंडविरुद्ध झालेला मोठा पराभव पाहता भारताच्या टी-२० संघात बरेच बदल दिसण्याची शक्यता आहे.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताला पॉवरप्लेचा लाभ उठवता आला नाही. सलामीवीर राहुल आणि रोहित शर्मा फ्लॉप ठरले. विराट कोहली आणि हार्दिक पांड्यानं अर्धशतकी खेळी केल्यानं संघाचा डाव सावरला. त्यामुळे संघाला १६८ धावा करता आल्या. गोलंदाजांनी पॉवरप्लेमध्ये इंग्लंडच्या फलंदाजांना वेसण घालून विकेट्स काढणं अपेक्षित होतं. मात्र भारतीय गोलंदाजांना एकही विकेट काढता आली नाही. त्यामुळे दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं.