न्यूयॉर्क: महागाई, मंदी, व्याजदर, सोने आणि शेअर बाजार या संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. अमेरिकेने गुरुवारी संध्याकाळी ऑक्टोबर महिन्यासाठी किरकोळ चलनवाढीचा डेटा (US CPI डेटा) जाहीर केला, ज्यामध्ये ऑक्टोबरमधील देशातील महागाई अपेक्षेपेक्षा कमी दर्शवली गेली. अमेरिकेतील किरकोळ महागाईचा दर ऑक्टोबरमध्ये ७.७ टक्क्यांवर होता. यापूर्वी सप्टेंबरमध्ये देशात किरकोळ महागाई ८.२ टक्के आणि ऑगस्टमध्ये ८.३ टक्के होती. तर गेल्या महिन्यात महागाई ७.९ टक्क्यांच्या आसपास राहण्याची अपेक्षा होती. त्यामुळे ऑक्टोबरमधील किरकोळ महागाई अपेक्षेपेक्षा कमी झाली आहे.

गेल्या काही महिन्यांमध्ये अमेरिकेतील महागाईने ४० वर्षांचा उच्चांक गाठला होता. या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने आक्रमकपणे प्रमुख व्याजदरात वाढ केली आहे.

महागाईने कंबरडे मोडले; १९ युरोपीय देशांच्या चलनवाढीचा दर विक्रमी पातळीवर, दोन घटक कारणीभूत
यूएस शेअर बाजारात मोठी उसळी
अमेरिकेतील किरकोळ महागाईची आकडेवारी घसरल्याने शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. महागाईच्या आकडेवारीत घसरण झाल्यानंतर अमेरिकन शेअर बाजारात चांगलीच उसळी पाहायला मिळाली. गुरुवारी संध्याकाळी, डाऊ जोन्स २.०७ टक्क्यांनी किंवा ६७३ अंकांनी वाढून ३३,१८७ वर व्यवहार करताना दिसला. दुसरीकडे, नॅस्डॅकमध्ये ४६४ अंकांची वाढ दिसून आली. महागाईची आकडेवारी जाहीर होण्यापूर्वी गुरुवारी बाजारात घसरण झाली होती.

महागाई आणखी भडकणार, SBIचा चिंताजनक अहवाल; वाचा सविस्तर तपशील
तसेच बीएसई निर्देशांक सेन्सेक्स ०.६९ टक्क्यांनी किंवा ४१९.८५ अंकांनी घसरून ६०,६१३ अंकांवर बंद झाला. त्याच वेळी, NSE ०.७१ टक्क्यांनी किंवा १२८.८० अंकांनी घसरून १८,०२८ वर बंद झाला. आज यूएस सीपीआय डेटा रिलीझ करण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगली. पण आता आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात शुक्रवारी चांगली गती पाहायला मिळू शकते.

जगभरात महागाई रेकॉर्ड-ब्रेक, पण जागतिक क्रमंवारीत भारताची स्थिती माहितेय का?
सोन्याच्या दरात मोठी तेजी
अपेक्षेपेक्षा महागाईचे आकडे कमी असल्याने अमेरिकेत सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. जागतिक बाजारात, कॉमेक्सवर सोन्याची फ्युचर्स किंमत १.७८ टक्के किंवा ३०.५० डॉलरच्या उसळीसह १७४४.२० डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत होती. त्याच वेळी, गुरुवारी संध्याकाळी, सोन्याची जागतिक स्पॉट किंमत १.८८ टक्के किंवा ३२.१२ वाढून १७३८.८६ डॉलर प्रति औंस झाली.

यूएस फेडने चौथ्यांदा दर वाढवले
या महिन्याच्या सुरुवातीला अमेरिकेच्या केंद्रीय बँकेने सलग चौथ्यांदा प्रमुख व्याजदरात वाढ केली. यूएस फेडने धोरण दर ०.७५ टक्क्यांनी वाढवून ४ टक्क्यांवर आणले. हा व्याजदर २००८ नंतरचा उच्चांक आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी चलनवाढ रोखण्यासाठी व्याजदर वाढविण्याचे त्यांचे पाऊल अंतिम टप्प्यात असल्याचे संकेत दिले होते. मात्र, आगामी काळात महागाई वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन चलनविषयक धोरण कडक करण्याबाबत समिती गांभीर्याने विचार करेल, असेही त्यांनी सांगितले. आता ऑक्टोबरमध्ये चलनवाढीत काहीसा दिलासा मिळाल्याने यूएस फेड आपली आक्रमक भूमिका काहीशी कमी करू शकते, जे भारतासह जगातील सर्व देशांसाठी हे शुभ संकेत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here