याबाबतची तक्रार आल्यानंतर विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन स. पो. नि. सुजीत गडदे, खेड पोलीस ठाणे यांनी आपल्या वरिष्ठांना या घटनेबाबत तात्काळ कळवले. त्यानंतर पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले व गुन्ह्याचा तपास तात्काळ सुरू करण्यात आला. रातोरात हे पथक आपल्या शेजारील जिल्ह्यामध्ये पोहोचले. या पथकाद्वारे तेथील सर्व हॉटेल्स व विश्रमगृहांचा शोधण्यात आला आणि अखेर त्या १७ वर्षीय मुलाला शोधण्यात रत्नागिरी पोलिसांना यश आले. मुलाला ताब्यात घेताच घटनेला वेगळेच वळण मिळाले.
पोलिसांनी अपहरणाबाबत या मुलाकडे चौकशी केली यावेळी त्याने दिलेले उत्तर हे धक्कादायक होते. मुलाने सांगितले की, मला इयत्ता १२वी च्या शिक्षणामध्ये कोणत्याच प्रकारचे स्वारस्य नाही आणि ‘आय. टी. आय’चे शिक्षण घ्यायचे आहे. मात्र आपल्या घरातील कोणालाच हे सांगू शकत नव्हतो व याच नैराश्यातून मी घर सोडून निघून आलो व मला चोरांनी परजिल्ह्यात पकडून नेल्याचा मी बनाव केला.
दरम्यान, महाविद्यालयात शिकणाऱ्या या १७ वर्षीय मुलाची योग्य समजूत घालत त्याचे समुपदेशन करून दिनांक १० नोव्हेंबर रोजी त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात सुखरूप देण्यात आले.
पालकांना अंतर्मुख करणारी घटना
असं म्हणतात सध्याचे युग हे स्पर्धेचं आहे. तुम्हाला या स्पर्धेत टिकायचं असेल तर शिक्षण देखील तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळे प्रत्येक पालक आपल्या मुलाच्या शिक्षणाकडे सध्या अतिशय गंभीरपणे पाहत असल्याचं दिसतं. अगदी एखादा विषय किंवा शाखा निवडताना देखील सर्व बाजूंचा पुरेपूर विचार केला जातो. या साऱ्या गोष्टींमध्ये विद्यार्थ्यांवरती दडपण देखील येत असल्याच्या गोष्टी समोर येत आहेत. त्यातूनच विद्यार्थ्यांकडून असे प्रकार घडतात. त्यामुळे पालकांनीही या गोष्टीकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे.
Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times