नवी दिल्लीः काँग्रेसचे खासदार आणि नेते यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणावर प्रश्न उपस्थित करत टीका केली. आता राहुल गांधी यांच्या टीकेला परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी उत्तर दिलंय. अमेरिका, युरोपसह शक्तिशाली देशांशी भारताचे संबंध अधिक घट्ट झाले असून आंरराष्ट्रीय पातळीवर सन्मानाचे स्थान आहे, असं एस. जयशंकर म्हणाले.

जयशंकर राहुल गांधींना म्हणाले…

चीनबरोबर आपण आता राजनितीक पातळीवर समान स्तरावर चर्चा करतो. एकीकडे पाकिस्तानच्या (तुम्ही सोडलेल्या) बालाकोटमधील दहशतवादी तळांवर भारताची कारवाई आणि उरी हल्ला तर दुसरीकडे शर्म अल शेख, हवाना आणि मुंबईवरील २६/११ चा भीषण दहशतवादी हल्ला यामध्ये नक्कीच फरक आहे. या बद्दल स्वतःला विचारा, असं जयशंकर म्हणाले.

राहुल गांधी व्हिडिओ जारी करत साधला निशाणा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्हिडिओ जारी करत भारताच्या परराष्ट्र धोरणावर टीका केली. राहुल गांधींच्या या व्हिडिओवरून जयशंकर यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. जयशंकर यांनी त्यांच्या व्हिडिओला टॅग करत एकामागून एक ट्विट केलं आणि मुद्दे मांडत उत्तर दिलं. गेल्या सहा वर्षात भारताचे परराष्ट्र धोरण आणि अर्थव्यवस्थेची चिंता वाढवणारे आणि बाधा पोहोचवणारे आहे, असं राहुल गांधी म्हणाले होते.

चीन आक्रमक झालाः राहुल गांधी

चीन आक्रमक का झाला? याविषयी गांधींनी व्हिडिओमधून सरकारवर हल्लाबोल केला आहे. मोदी सरकारच्या काळात देश दुबळा झाला असल्याचा आरोप त्यांनी केला. यावर परराष्ट्रमंत्र्यांनी ट्विटमधून उत्तर दिले. ‘राहुल गांधी यांनी परराष्ट्र धोरणावर प्रश्न विचारले आहेत. यावर काही उत्तरं आहेत. आपली महत्त्वपूर्ण युती अधिक घट्ट झाली आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची पत वाढली आहे. अमेरिका, रशिया, युरोप, जपानबरोबर शिखर व अनौपचारिक बैठकाही होत आहेत’, असं जयशंकर म्हणाले.

आता मोकळेपणाने चर्चा करू शकतो

चीनशी आपण राजनितीक स्वरुपात अधिक समान पातळीवरील चर्चा करतो. विश्लेषकांना विचारा. भारत आता चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर (सीपीईसी), चीनचे बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह, दक्षिण चीन समुद्र आणि संयुक्त राष्ट्रांनी घोषित केलेल्या दहशतवाद्यांविषयी अधिक उघडपणे चर्चा करतो. याबद्दल माध्यमांना आणि विश्लेषकांना विचारा, असं जयशंकर म्हणाले. ‘काही तथ्य शेजार्‍यांबद्दलही आहेत. श्रीलंका आणि चीन यांच्यात २००८ मध्ये हब्बनटोटा बंदराबाबत करार झाला होता. जे याचा सामना करत करत आहेत याबद्दल त्यांना विचारा. मालदीवशी कठोर संबंध… २०१२ मध्ये भारत अध्यक्ष नशीद यांचे सरकार पडताना पहात होता आणि यासह अनेक गोष्टी बदलल्या आहेत. आपल्या व्यापाऱ्यांनाही विचारा’, असं म्हणत जयशंकर यांनी राहुल गांधींना उत्तर दिलं.

बांगलादेशसोबत २०१५ मध्ये जमिनीचा मुद्दा सुटल्याने विकास आणि व्यवहाचे मार्ग मोकळे झाले आहे. आता तिथे दहशतवाद्यांना आश्रय दिला जात आहे. आपल्या सुरक्षा दलांना याबद्दल विचारा. नेपाळमध्ये १७ वर्षांनी पंतप्रधानांचा दौरा होता. त्यानंतर ऊर्जा, इंधन, हॉस्पिटल्स सह अनेक विकास योजनांना चालना दिली गेली. त्यांच्या नागरिकांना विचारा, असं जयशंकर म्हणाले.

एक भक्कम सुरक्षा आणि विकासाचा भागिदार म्हणून भूतान आता भारताकडे पाहतो. आफगाणिस्तानमध्ये सलमा प्रकल्प आणि संसदे उभारण्याच्या योजना पूर्ण होतात. आंतरराष्ट्रीय संबंध अधिक बळकट झाले आहेत. अमेरिका, रशिया, युरोपी देशांशी भारताचे आता उत्तम संबंध आहेत, असं परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here