टी-२० विश्वचषक स्पर्धेतील भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे. उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध मानहानीकारक पराभव झाल्यानं भारताच्या विश्वचषक जिंकण्याचं स्वप्नांना सुरुंग लागला. भारतानं दिलेलं १६९ धावांचं आव्हान इंग्लंडनं १० विकेट्स राखून पार केलं. या सामन्यात भारतीय गोलंदाज निष्प्रभ ठरले. तर संपूर्ण मालिकेत भारताचे सलामीवीरांना अपयश आलं.

रोहित शर्मा आणि लोकेश राहुलला एका सामन्यासाठी प्रत्येकी ३ लाख रुपये मानधन मिळतं. त्यामुळे दोघांना एका सामन्यासाठी ६ लाख रुपये मिळतात. दोन्ही खेळाडू विश्वचषकात ६ सामने खेळले. त्यासाठी त्यांना ३६ लाख रुपये मानधन मिळेल. दोघांनी एकूण २४४ धावा केल्या. ३६ लाख रुपयांना २४४ नं भागल्यास उत्तर येतं १४,७५४. याचा अर्थ रोहित आणि राहुलची एक धाव भारताला १४ हजार ७५४ रुपयांना पडली. साधारणत: एका सर्वसामान्य भारतीयाचा महिन्याचा पगार १५ हजारांच्या आसपास असतो.
रोहित आणि राहुलला खूप मानधन मिळतं याचं भारतीय क्रिकेट चाहत्यांना दु:ख नाही. खूप मेहनत घेऊन दोघे इथपर्यंत पोहोचले आहेत. दोन खेळाडू स्पर्धेत अपयशी ठरल्यामुळे भारतीय चाहत्यांना दु:ख झालं आहे. संपूर्ण स्पर्धेत विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव सातत्यपूर्ण खेळले. लोकेश राहुलनं दोन अर्धशतकं केली. मात्र ती कमकुवत संघांविरोधात होती. संघाला उत्तम सुरुवात करून देण्यात रोहित आणि राहुल सातत्यानं अपयशी ठरले.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.