मोठा भाऊ रुपेंद्र प्रमाणेच लहान भाऊ अंकितही लष्कर भरतीची तयारी करत होता. एनसीसी कॅम्पमध्ये राहून तो भरती प्रक्रियेची तयारी करत होता. तो आयटीआयची परीक्षा उत्तीर्ण झाला होता. रुपेंद्रचा मृत्यू ४ नोव्हेंबरला झाला. त्याआधी ३ नोव्हेंबरला अंकित लष्कराच्या भरतीत सहभागी झाला. त्याचीही प्रकृती भावासारखीच अचानक बिघडली. धावण्याच्या स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर तो कोसळला. त्यालाही घेऊन कुटुंबीय बैतूलला पोहोचले. तिथून मग त्याला नागपुरातील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आलं. चार दिवस त्याचा मृत्यूशी संघर्ष सुरू होता. मात्र तो अपयशी ठरला.
दोन्ही भावांचा सारख्याच प्रकारे सारख्याच परिस्थितीत मृत्यू झाला आहे. दोन तरुण मुलं अचानक गेल्यानं कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रुपेंद्रच्या मृत्यूचं कारण डॉक्टरांना समजू शकलेलं नाही. रुपेंद्रच्या दोन्ही किडण्या खराब झाल्या होत्या अशी माहिती त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. योगेश पंडाग्रे यांनी दिली. रुपेंद्रच्या यकृताला सूज आली होती. त्याच्या फुफ्फुसात पाणी भरलं होतं. दोन्ही तरुणांना सिकल सेल ऍनिमियाचा त्रास होता. मात्र त्यांचं शवविच्छेदन करण्यात आलं नाही. यामुळे त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण समजलेलं नाही, असं पंडाग्रे म्हणाले.
लष्करात सहभागी होण्यासाठी, भरती परीक्षेसाठी दोन्ही भाऊ स्टॅमिना वाढवणारं औषध घेत असावेत असा अंदाज पंडाग्रे यांनी वर्तवला आहे. या औषधाच्या अतिसेवनामुळे त्यांचा मृत्यू झाला असावा अशी शंका त्यांनी व्यक्त केली. धावताना थकवा लागल्यानं आणि स्नायू दुखावल्यानंही मृत्यू झालेला असू शकतो, असंही पंडाग्रे यांनी सांगितलं. दोन्ही भावांच्या रक्ताचे नमुने दिल्लीला तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.