मुंबई: टी-२० विश्वचषक स्पर्धेतील भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे. उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध मानहानीकारक पराभव झाल्यानं भारताच्या विश्वचषक जिंकण्याचं स्वप्नांना सुरुंग लागला. भारतानं दिलेलं १६९ धावांचं आव्हान इंग्लंडनं १० विकेट्स राखून पार केलं. या सामन्यात भारतीय गोलंदाज निष्प्रभ ठरले. त्यामुळेच भारताला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं.

इंग्लंडविरुद्धच्या मानहानीकारक पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड क्रिकेट चाहत्यांच्या रडारवर आहेत. दोघांनी मिळून केलेले प्रयोग अपयशी ठरले. काही निर्णय तर अत्यंत धक्कादायक होते. यातलाच एक निर्णय होता लेग स्पिनर युझवेंद्र चहलला न खेळवणं. संपूर्ण स्पर्धेत चहलला एकाही सामन्यात खेळवण्यात आलं नाही.
राहुल, रोहितची एक धाव भारताला १४ हजार ७५४ रुपयांना पडली; BCCI दोघांचा ‘हिशोब’ करणार?
युझवेंद्र चहलला संधी न देणं भारतीय संघाला महागात पडलं. टी-२० विश्वचषक २०२२ च्या सुपर-१२ मध्ये आतापर्यंत ९ लेग स्पिनर्सनी मिळून १३१ षटकं टाकली. त्यात त्यांनी २२.२९ च्या सरासरीनं एकूण ४१ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. या गोलंदाजांची इकॉनॉमी ६.९३ आणि स्ट्राईक रेट १९.२९ होता.

इंग्लंडनं दोन लेग स्पिनर्सना संधी दिली. तर अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, आर्यलंड, पाकिस्तान, श्रीलंका आणि झिम्बाब्वे यांनी प्रत्येकी एका लेग स्पिनरला संधी दिली. भारतासह दक्षिण आफ्रिका, नेदरलँड्स आणि बांगलादेशनं लेग स्पिनर्सला संधी दिली नाही. सध्याच्या घडीला स्पर्धेत श्रीलंकेचा गोलंदाज वानिंदू हसरंगाचं सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे.
इंग्लंडला धुतले, टीम इंडियाला सावरले; कोहलीनं चार मोठे विक्रम रचले; पठ्ठ्या लौकिकाला जागला
टी-२० विश्वचषक स्पर्धा २०२२ च्या सुपर-१२ मध्ये आतापर्यंत १७ ऑफ स्पिनर्सनी १११ षटकं गोलंदाजी केली. त्यांनी २४.४४ च्या स्ट्राईक रेट आणि ७.४६ च्या इकॉनॉमी रेटनं ३४ फलंदाजांना बाद केलं. स्पर्धेत आतापर्यंत १४ डावखुऱ्या स्लो स्पिनर्सनी १२२ षटकं टाकली. त्यांनी ७.३१ च्या इकॉनॉमी आणि २०.३९ च्या स्ट्राईक रेटनं ३६ फलंदाजांनी पॅव्हेलियनमध्ये धाडलं. याचा अर्थ लेग स्पिनर्सची इकॉनॉमी, सरासरी आणि त्यांनी घेतलेल्या विकेट्स इतर गोलंदाजांच्या तुलनेत जास्त आहेत. लेग स्पिनर्सची सरासरीदेखील वरचढ राहिली. मात्र तरीही रोहित शर्मा आणि राहुल द्रविडनं चहलला संधी दिली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here