आता भाजपनं गुजरात निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. त्यात गडकरींसह केंद्रातील निवडक मंत्र्यांचा समावेश आहे. पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचंही नाव यादीत आहे. स्टार प्रचारकांची एकूण संख्या ४० इतकी आहे. गुजरात भाजपचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा आणि स्मृती इराणी यांच्या नावाचा समावेशदेखील यादीत आहे.
काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा समावेशदेखील स्टार प्रचारकांच्या यादीत करण्यात आलेला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुजरात निवडणुकीत पक्षाचे स्टार प्रचारक असतील. याच यादीत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांचाही समावेश आहे. या दोघांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे.
गुजरातमध्ये विधानसभेचे एकूण १८२ मतदारसंघ आहेत. यासाठी दोन टप्प्यांत निवडणूक होईल. भाजपनं आतापर्यंत १६० जागांवर उमेदवारांची घोषणा केली आहे. रुपाणी, पटेल यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचं पक्षाकडून सांगण्यात आलं आहे. त्यांनी याबद्दल केंद्रीय नेतृत्त्वाला पत्र लिहून कळवल्याची माहिती भाजपकडून देण्यात आली आहे.