देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे सहकारी आणि भाजपचे आमदार गिरीश महाजन यांना फोन केला होता. ‘गिरीश, मला करोना झाला तर खासगी रुग्णालयात भरती करू नका. मुंबईत सरकारी रुग्णालयातच भरती करा,’ अशी भावना फडणवीसांनी व्यक्त केली होती. फडणवीसांची ही बातमी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’ने केली होती. त्यावर ‘सामना’तून अग्रलेख लिहिण्यात आला असून फडणवीसांचं कौतुक करतानाच त्यांना टोलेही लगावण्यात आले आहेत. विरोधी पक्षनेत्यांनी राज्यातील डॉक्टर, परिचारिका यांच्यावर विश्वास व्यक्त केला. आपल्याला काही झाले तरी हीच सरकारी यंत्रणा सुखरूप ठेवेल हा त्यांचा आत्मविश्वास सरकारला व हजारो करोनाग्रस्तांना बळ देणारा आहे. त्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक तरी किती करावे? नव्हे, ते करायलाच हवे, असं शिवसेनेने म्हटलं आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आजही तितकेच तरुण, तडफदार वगैरे आहेत, जितके ते मुख्यमंत्रीपदावर असताना होते. फडणवीस यांचे एक भावनिक आणि हृदयस्पर्शी वक्तव्य समोर आले आहे, असंही अग्रलेखात म्हटलं आहे.
>> फडणवीस यांचे नेहमीचेच टुमणे असते की, ‘सामना’तून कधी आपल्या पाठीवर कौतुकाची थाप पडत नाही. त्यांचे हे म्हणणे म्हणजे अर्धसत्य आहे. फडणवीस हे मुख्यमंत्रीपदी असताना ‘सामना’ वाचत नव्हते असा दावा त्यांनी केला. त्यामुळे त्यांच्यावर केलेले कौतुकाचे क्षण वाचनातून निसटले असावेत. ‘वाचाल तर वाचाल’ असा एक मंत्र आहे. त्यामुळे ‘सामना’ सोडून फडणवीस इतर काही वाचत असावेत व त्यामुळेच आता विरोधी पक्षनेते म्हणून त्यांना नियमित ‘सामना’ वाचावा लागतो. फडणवीस हे विरोधी पक्षनेते म्हणून उत्तम काम करीत आहेत असे आम्ही याच स्तंभात अनेकदा सांगितले. ही कौतुकाची थाप नाही काय? ही तर सगळय़ात मोठी शाबासकी आहे.
>> राज्यातील आरोग्य यंत्रणेवर फडणवीस हे संपूर्ण समाधानी आहेत व उद्या आपल्याला करोना झालाच तर कोणत्याही खासगी इस्पितळात न पाठवता सरकारी इस्पितळातच दाखल करावे असे ‘विल’ म्हणजे इच्छापत्र त्यांनी गिरीश महाजनांवर सोपवले. काहींना यातही फडणवीस यांचा ‘स्टंट’ वाटतो आहे. मात्र त्यांनी त्यांच्या सहज भावना व्यक्त केल्या आहेत. त्याला स्टंट वगैरे म्हणणे योग्य नाही. किंबहुना, या त्यांच्या भावनांचे कौतुक करावेच लागेल व समस्त महाराष्ट्रीय जनतेने त्यांची पाठ थोपटावी असा हा प्रसंग आहे. फडणवीस हे काल राज्यकर्ते होते. त्यामुळे सरकारी यंत्रणा काय होती, काय आहे याचे भान त्यांना आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times