एमएमआरटीएने काळ्या-पिवळ्या टॅक्सी आणि ऑटोच्या भाड्यात वाढ करण्यास मान्यता दिली आहे. ४ सदस्यीय खटुआ पॅनलच्या सूत्रानुसार हे निर्णय घेण्यात आले. खटुआ पॅनेलने १२ किमीपर्यंतच्या टॅक्सी चालकांसाठी २५ टक्के आणि ४ किमीपर्यंत २० टक्के सवलत सुचवली होती. आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय टर्मिनलचे किमान भाडे १२७ रुपये आणि देशांतर्गत टर्मिनलचे ८५ रुपये होते.
दोन हजार बसेससाठी स्टेज कॅरेज परमिटही मंजूर
दरम्यान,भाडेवाढीच्या निर्णयाबरोबरच, एमएमआरटीएने २,००० बसेससाठी स्टेज कॅरेज परमिट देखील मंजूर केले आहे. यामुळे बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्टला (बेस्ट) अधिक बस चालवण्याची आणि चांगली सेवा देण्याची संधी मिळणार आहे.
९२ नवीन टॅक्सी आणि ऑटोरिक्षा स्टँडलाही मंजुरी
प्राधिकरणाने मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) ९२ नवीन टॅक्सी आणि ऑटोरिक्षा स्टँडलाही मान्यता दिली आहे. यामध्ये ७३ ऑटोरिक्षा स्टँड, ९ टॅक्सी स्टँड, ७ शेअर ऑटोरिक्षा स्टँड आणि ३ शेअर टॅक्सी स्टँडचा समावेश आहे.
सप्टेंबरमध्येही झाली होती भाडेवाढ
लक्षात घ्या की यापूर्वी सप्टेंबरमध्ये एमएमआरटीएने काळ्या-पिवळ्या टॅक्सी आणि ऑटो रिक्षांमधील प्रवासाभाडे अनुक्रमे किमान ३ रुपये आणि २ रुपयांनी वाढवले होते. तसेच प्राधिकरणाने काळ्या-पिवळ्या टॅक्सींमध्ये १.५ किमी अंतरासाठी किमान भाडे २८ रुपये आणि ऑटो रिक्षामध्ये समान अंतरासाठी २३ रुपये केले होते.