Maharashtra Political crisis | गजानन किर्तीकर यांना काही गोष्टी पटत नव्हत्या तर त्यांनी पक्षात राहून मत मांडणे गरजेचे होते. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत शिवसेनेचे अडीच वर्षे सरकार होते. ही बाब मान्य नव्हती तर गजानन किर्तीकर यांनी पहिल्याच दिवशी विरोध करायला पाहिजे होता. आता ते उगाच काहीतरी बोलत आहेत, त्यांना म्हातारचळ लागलाय, अशी टीका चंद्रकांत खैरे यांनी केली.

हायलाइट्स:
- गजानन किर्तीकर शिवसेनेच्या जुन्या फळीतील नेते
- किर्तीकर यांचा शिंदे गटात प्रवेश
गजानन किर्तीकर यांना काही गोष्टी पटत नव्हत्या तर त्यांनी पक्षात राहून मत मांडणे गरजेचे होते. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत शिवसेनेचे अडीच वर्षे सरकार होते. ही बाब मान्य नव्हती तर गजानन किर्तीकर यांनी पहिल्याच दिवशी विरोध करायला पाहिजे होता. आता ते उगाच काहीतरी बोलत आहेत, त्यांना म्हातारचळ लागलाय, अशी टीका चंद्रकांत खैरे यांनी केली.
गजानन किर्तीकर काहीही कारणं सांगत आहेत: अंबादास दानवे
गजाभाऊ हे शिवसेनेतील ज्येष्ठ नेते राहिलेले आहेत. मराठवाडा, जालन्यात त्यांनी सुरुवातीच्या काळात मोठे काम केले आहे. अशा नेत्यांनी संघटना सोडणं धक्कादायक आणि क्लेशदायक आहे. त्यांच्याकडून पक्ष सोडण्यासाठी फुटकळ कारणं देण्यात आली. गजानन किर्तीकर यांची यापूर्वीची भाषणं काढून पाहिली तर त्यांनी जीव तोडून भाजपवर टीका केली आहे. त्यांच्याच विभागात भाजपने त्यांना त्रास कसा दिला, हे त्यांनी जाहीरपणे सांगितले आहे. पक्ष सोडताना काही कारण द्यावी लागतात, म्हणून ते काहीही बोलत आहेत, असे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटले.
गजानन किर्तीकर गेल्याने पक्षाला फारसा फरक पडत नाही, उद्या लोकं त्यांना विसरतील: संजय राऊत
गजानन किर्तीकर हे शिंदे गटात गेल्याने आमच्या पक्षात थोडीशी सळसळही झालेली नाही. ते शिंदे गटात गेल्याने विशेष फरक पडत नाही. उद्या लोकं त्यांना विसरून जातील, अशी टीका ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली. गजानन किर्तीकर हे आमचे ज्येष्ठ सहकारी होते. या वयात पक्षाने त्यांना काय दिलं नाही? किर्तीकर पाचवेळा आमदार राहिले, दोनवेळा मंत्रिमंडळात होते. दोनवेळा पक्षाने त्यांना खासदारकी दिली. त्यांचे पूत्र अमोल किर्तीकर हे ठाकरे गटासोबत राहिले आहेत. त्यामुळे आमच्या गजानन किर्तीकर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले. ते शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी संजय राऊत यांनी गजानन किर्तीकर यांच्या पक्षनिष्ठेविषयी शंका उपस्थित केली. गजानन किर्तीकर यांच्यासारखे नेते सगळं मिळूनही पक्ष सोडून जातात तेव्हा लोकांच्या मनात निष्ठा या शब्दाविषयी शंका उपस्थित होते. यावेळी राऊत यांना गजानन किर्तीकर यांनी ठाकरे गटावर केलेल्या टीकेविषयी विचारणा करण्यात आली. तेव्हा राऊत यांनी म्हटले की, आता गजानन किर्तीकर यांच्या बोलण्याला फारसा अर्थ उरलेला नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.