लंडन: ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत कुटुंब, हिंदुजा कुटुंबातील वाद अखेर मिटला आहे. हिंदुजा बंधूंमधील अब्जावधी डॉलर्सच्या कौटुंबिक संपत्तीबाबत ब्रिटनच्या उच्च न्यायालयात खटला सुरू होता. पण आता त्यांनी आपापसात गुप्त करार केला आहे. लंडनमधील एका अपील न्यायालयाने आपल्या निर्णयात ही माहिती दिली.

हिंदुजा बंधूंमध्ये ज्येष्ठ ८६ वर्षीय श्रीचंद हिंदुजा यांनी त्यांचे भाऊ जीपी हिंदुजा, पीपी हिंदुजा आणि एपी हिंदुजा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. ही बाब २ जुलै २०१४ रोजीच्या पत्राच्या वैधतेशी संबंधित आहे, ज्यात म्हटले की कोणत्याही एका भावाकडे असलेली संपत्ती सर्व भावांचीच मानली जाईल, असे या पत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते. तसेच या पत्रात कोणत्याही भावाला त्याच्या दुसऱ्या भावाला एक्झिक्युटर म्हणून नेमण्याचा अधिकारही देण्यात आला होता. नोव्हेंबर २०१९ पासून यावरून कायदेशीर वाद सुरू होता.

हिंदुजा बंधूंमध्ये दीवार ; संपत्तीसाठी चढले कोर्टाची पायरी
हिंदुजा बंधूंमध्ये करार झाला असल्याचे ब्रिटिश उच्च न्यायालयाला शुक्रवारी सांगण्यात आले. हिंदुजा कुटुंबातील वादाचे मूळ २०१४ मध्ये झालेला करार होता, ज्यावर चारही भावांच्या सह्या होत्या. श्रीचंद हिंदुजा यांच्या तीन लहान भावांनी हे पत्र १०० वर्षांहून अधिक जुन्या हिंदुजा समूहासाठी उत्तराधिकार योजना आहे, असा युक्तिवाद केला. मात्र त्यांना बाजूला केले जात असल्याचा आरोप श्रीचंद हिंदुजा यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

वादाचे मूळ
कुटुंबाने समझोता संपवण्यास सहमती दर्शवली होती, असे जूनमध्ये श्रीचंद हिंदुजा यांच्या वकिलांनी सांगितले होते. हा करार होताच कुटुंबाच्या विभाजनाचा मार्गही मोकळा झाला आहे. लक्षात घ्या की हिंदुजा समूहात डझनभर कंपन्यांचा समावेश आहेत. कंपनीचा व्यवसाय ट्रक उत्पादनापासून बँकिंग, रसायने, उर्जा, मीडिया आणि आरोग्यसेवा पर्यंत पसरलेला आहे. समूह कंपन्यांमध्ये अशोक लेलँड आणि इंडसइंड बँक यांचा समावेश आहे. या समूहाच्या कंपन्यांचा व्यवसाय ३८ देशांमध्ये पसरलेला असून १५०,००० हून अधिक कर्मचारी त्यामध्ये काम करतात.

हिंदुजा ब्रिटनमधील श्रीमंत आशियाई
हिंदुजा कुटुंबात तेढ निर्माण झाल्याची पहिली बातमी तेव्हा समोर आली जेव्हा श्रीचंदच्या मुलींनी स्वित्झर्लंडस्थित हिंदुजा बँकेवर नियंत्रण मिळवण्यासाठी कोर्टात केस दाखल केली. श्रीचंद यांची मुलगी शानू हिंदुजा या बँकेच्या अध्यक्ष आहेत आणि त्यांचा मुलगा करम हिंदुजा हा बँकेचा मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. मात्र, कुटुंबातील इतर सदस्यांनाही या बँकेवर त्यांचे नियंत्रण हवे होते, त्यानंतर वाद सुरू झाला. या वादामुळे १०० वर्षांहून अधिक जुने कॉर्पोरेट साम्राज्य कोसळण्याच्या उंबरठ्यावर आले. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार श्रीचंद हिंदुजा डिमेंशियाने त्रस्त आहेत.

स्वतंत्र जबाबदारी
प्रत्येक भावाची व्यवसायासाठी वेगळी जबाबदारी असते. श्रीचंद हिंदुजा हे संपूर्ण समूहाचे अध्यक्ष आहेत. त्यांनीच IndusInd बँक सुरू केली, जी भारतातील अग्रगण्य खाजगी बँकांपैकी एक आहे. गोपीचंद हिंदुजा हे समूहाचे सह-अध्यक्ष असून ते हिंदुजा ऑटोमोटिव्ह लिमिटेड, यूकेचे अध्यक्षही आहेत. तर तिसरा भाऊ प्रकाश सध्या युरोपमधील हिंदुजा समूहाचे अध्यक्ष आहेत, तर अशोक भारतातील हिंदुजा समूहाचे अध्यक्ष आहेत. श्रीचंद आणि गोपीचंद लंडनमध्ये राहतात. प्रकाश मोनॅकोमध्ये तर अशोक भारतात राहतो. फोर्ब्सच्या रिअल टाईम नेट वर्थ यादीनुसार हिंदुजा बंधू जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत ११०व्या क्रमांकावर आहेत.

हिंदुजा ग्रुपची स्थापना कधी झाली
हिंदुजा ग्रुपची स्थापना ब्रिटिश भारतातील सिंध प्रांतातील श्रीचंद परमानंद यांनी १९१४ मध्ये केली होती. हिंदुजा समूह ही एकेकाळी कमोडिटी-व्यापाराची फर्म होती, पण श्रीचंद आणि त्यांच्या भावांनी त्यांचा व्यवसाय इतर क्षेत्रांमध्ये सातत्याने वाढवला. सुरुवातीचे यश भारताबाहेर बॉलीवूड चित्रपटांच्या वितरणातून मिळाले. त्यानंतर त्यांचा व्यवसाय वाढला. श्रीचंद आणि गोपीचंद हे ब्रिटीश नागरिक आहेत आणि ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी आहेत. समूहाचा भारतातही मोठा व्यवसाय आहे. भारतात या समूहाच्या सहा सूचीबद्ध कंपन्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here