औरंगाबाद: औरंगाबादमध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी केल्यानंतर आता करोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आणखी कठोर निर्णय घेतले आहेत. उद्यापासून शहरातील दुकानदारांना दुकाने उघडता येणार आहेत. मात्र, करोना चाचणी केल्याचं प्रमाणपत्रं नसताना दुकाने उघडणाऱ्यांवर एफआयआर दाखल करण्यात येणार आहेत. तसा इशाराच पालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिला आहे.

औरंगाबादमध्ये वाढलेला करोनाचा कहर रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने कठोर पावलं उचलली होती. त्याचाच एक भाग म्हणून औरंगाबादमध्ये कडक लावण्यात आला होता. या दरम्यान पालिका प्रशासनाने नागरिकांची टेस्ट करण्यावर आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर दिला होता. त्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाला. त्यामुळे आता करोनाची साखळी तोडण्यावर प्रशासनाने भर दिला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आजच्या मध्यरात्रीपासून लॉकडाऊन शिथिल केला जात आहे. त्यामुळे रविवारपासून सगळे व्यवहार सुरु होतील. व्यवहार सुरु करताना शहरातील सगळे व्यापारी, भाजी व फळ विक्रेते यांना अँटीजेन टेस्ट सक्तीची करण्यात आली आहे. ही टेस्ट न करता कुणी व्यापार सुरू केला तर त्याच्यावर एफआयआर दाखल केला जाईल असा इशारा महापालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिला. आज दुपारी दोन वाजेपासून अँटीजेन टेस्टसाठी शिबीरांचे आयोजन केले जाणार आहे असेही ते म्हणाले.

दरम्यान, गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी तसेच ग्राहकांना खरेदीसाठी मुबलक वेळ मिळावा, यासाठी सर्व मार्केट रात्री ८ वाजेपर्यंत खुली ठेवण्यात यावी, मुख्य बाजारपेठेत एकाच ठिकाणी उभे राहणारे हातगाडीवाले, फेरीवाले यांना काही काळ प्रतिबंध करावा, अन्यथा त्यांची एखाद्या मोकळ्या जागी व्यवस्था करावी, वन वे नियमाचे अंमलबजावणी काटेकोरपणे करा, यासह अन्य मागण्या महापालिका प्रशासकांकडे करण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जग्गनाथ काळे यांनी दिली. व्यापाऱ्यांसाठी महापालिकेच्या माध्यमातून तपासणी शिबिराचे आयोजन ही करण्यात आल्याचे त्यांनी केले नमूद.

दरम्यान, औरंगाबादेत काल दिवसभरात ३३८ नवे करोनाबाधित आढळून आले. यामध्ये शहरातील २४८, तर ग्रामीण भागातील ९० बाधितांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या दहा हजार ८२ झाली आहे. त्याचवेळी शुक्रवारी दिवसभरात करोनामुक्त झालेल्या २२५ व्यक्तींना सुटी देण्यात आली. यात शहरातील १५६ व ग्रामीण भागातील ६९ व्यक्तींचा समावेश आहे. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात करोनामुक्त झालेल्यांची संख्या ५८६१ झाली आहे. सध्या ३८३६ बाधितांवर उपचार सुरू आहेत. तर, आतापर्यंत जिल्ह्यातील ३८५ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here