ठाण्याच्या व्हिव्हियाना मॉलमधील चित्रपटगृहात ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो बंद पाडण्याचा जितेंद्र आव्हाडांनी आपल्या कार्यकर्त्यांसह प्रयत्न केला होता. यादरम्यान चित्रपटगृहात जरासा राडाही झाला होता. याच प्रकरणावरुन आव्हाडांवर काल गुन्हा दाखल झाला होता. काल सायंकाळी त्यांना अटक झाली होती. कालच्या अटकेनंतर आज कोर्टाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. पण आव्हाडांच्या वकिलांनी जामीनासाठी अर्ज केल्यानंतर हॉलिडे कोर्टाने आव्हाडांसह इतरही १२ जणांना जामीन मंजूर केला.
कार्यकर्त्यांनी फटाके फोडले, आव्हाडांवर पुष्पवृष्टी
जितेंद्र आव्हाड यांना जामीन मिळाल्यानंतर राष्ट्रवादीच्या गोटात आनंदाचं वातावरण पसरलं. कार्यकर्त्यांनी लगोलग जल्लोषाची तयारी केली. पुढच्या काही मिनिटांतच काही कार्यकर्त्यांनी वर्तकनगर पोलीस स्टेशनच्याबाहेर फटाके फोडले. तोपर्यंत जितेंद्र आव्हाड कोर्टाबाहेर आले होते. आव्हाडांच्या स्वागतासाठी शेकडो कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. आव्हाडांचं दर्शन होताच कार्यकर्त्यांनी समर्थनार्थ घोषणाबाजी करायला सुरुवात केली. कार्यकर्त्यांचा पाठिंबा पाहून आव्हाडही गलबलून गेले. जरासे भावूक होत त्यांनीही कार्यकर्त्यांना शांत राहण्याच्या सूचना दिल्या. पण पुढच्याच मिनिटाला त्यांनीही कार्यकर्त्यांच्या उत्साहात सहभागी होऊन “तुमचं माझं नातं काय? जय भवानी जय शिवराय… जय जय जय जय जय भीम…”, अशा घोषणा दिल्या. अन् गाडीत बसून ते आपल्या निवासस्थानाकडे रवाना झाले.
राष्ट्रवादीच्या नेत्यांचा-कार्यकर्त्यांचा आव्हाडांना फुल्ल सपोर्ट…
जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादीचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांच्यासह ११ जणांना पोलिसांनी शुक्रवारी अटक केली होती. आज सकाळी वर्तकनगर पोलिसांनी जितेंद्र आव्हाड आणि ११ कार्यकर्त्यांना ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या हॉलिडे कोर्टामध्ये हजर केले होते. आव्हाड यांच्या अटकेनंतर त्यांचे समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने न्यायालयाच्या परिसरात गर्दी केली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून आव्हाड यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. विशेष म्हणजे यामध्ये महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येत होत्या. दरम्यान, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात केला होता. तसेच पोलिसांकडून कोर्टाच्या दिशेने येणारे तिन्ही रस्ते बंद करण्यात आले होते.