येणारी सातारा नगरपालिका निवडणूक भाजपाच्याच चिन्हावर लढवणार, असं विधान बावनकुळे यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानावर आमदार शिवेंद्रराजे भोसलेंनी सुद्धा स्मित हास्य केलेलं पाहायला मिळालं. यामुळं आता निवडणुकीत दोन्ही राजे कोणत्या चिन्हावर लढणार की नगरपालिकेत आमचं आम्हाला पाहुद्या, या त्यांच्या नेहमीच्या मागणीवर ठाम राहणार हे काळ आणि भारतीय जनता पार्टी ठरवेल. मात्र चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या या विधानाला आता महत्व प्राप्त झालय.
दोन्ही राजे भारतीय जनता पार्टीत आहेत. मागच्या नगरपालिका निवडणुकीत सुद्धा काही नेत्यांनी दोन्ही राजेंना एकत्र आणत निवडणूक चिन्हावर लढा असा आग्रह धरला. मात्र दोघांच्या बाजूने नकार घंटा मिळाल्यावर वरिष्ठ नेत्यांनी साताऱ्यातील नगरपालिका निवडणुकीत लक्ष घातलं नाही. भारतीय जनता पार्टी ही निवडणूक चिन्हावरच लढवली गेली पाहिजे यासाठी आग्रही असते. आता दोन्ही राजेंना एकत्र आणत नगरपालिका निवडणकीत भाजपाच्या चिन्हावर लढण्याचा विडा बावनकुळेंनी उचल्लाय खरा, परंतु उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांना किती दाद देतायेत हे पाहण्यासारखं असणार आहे.
खासदार उदयनराजे भोसले हे पक्ष विरहीत राजकारणावर भर देतात. तर आमदार शिवेंद्रराजेंचा विश्वास स्वत:च्या गटावर आहे. यामुळं येणारा काळ हा भाजप पक्षनेतृत्वासाठी आव्हानात्मक असणार आहे. दोन्ही राजेंना नगरपालिका निवडणूक आणि जिल्हा परिषद निवडणुकीत एकत्र आणणार कसं, हे आव्हान राज्यातील भाजपच्या नेत्यांना पेलावं लागेल अशा चर्चा सध्या साताऱ्यात जोर धरू लागल्या आहेत.