डोंबिवली : दीड कोटी रुपयांच्या खंडणीसाठी १२ वर्षीय मुलाचे अपहरण करण्यात आल्याची घटना डोंबिवली शहरात उघडकीस आली आहे. मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार येताच २०० पेक्षा अधिक पोलीस कर्मचाऱ्यांची २० पथक बनवून तीन दिवस शोध मोहीम राबवल्यानंतर अखेर सुरत येथून आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार असून मुलाचं अपहरण केल्यानंतर ते विविध राज्यांमध्ये फिरत होते, असंही स्पष्ट झालं आहे.
दरम्यान, ७५ तासांनंतर पोलिसांनी दोन पुरुषांसह तीन महिलांना अटक केली आहे. फरहशहा फिरोजशहा रफाई , प्रिस कुमार सिंग, शाहीन मेहतर, फरहिंद सिंग आणि नाझिया रफाई अशी या अपहरण करणाऱ्या आरोपींची नावे आहेत.
दरम्यान, अपहरण करणाऱ्या आरोपींवर याआधी हत्या, दारूची तस्करी व घरफोडी असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.