कणकवली बाजारपेठेतील संध्याकाळी ५ ते ६ वाजेच्या दरम्यानची ही घटना असल्याचा दावा निलेश राणे यांनी केला आहे. बाजारातून भर पावसात कार घेऊन जात असताना राऊत यांच्या मुलाला पोलिसांनी अडवलं. यावेळी त्यांची एका पोलिसासोबत हुज्जत झाली आणि शिवीगाळही करण्यात आली. ऐकत नसल्याने संतापलेल्या राऊतांच्या मुलाने मी खासदार विनायक राऊत यांचा मुलगा आहे. तुला सोडणार नाही, असा दम भरला. त्यावर दुसऱ्या पोलिसांनी अशी नोकरी घालवणारे खूप पाहिलेत असं सांगत राऊत यांच्या मुलाला भीक न घातल्याचं व्हिडिओतून दिसून येत आहे.
निलेश राणे यांनी मात्र, राऊत यांचा मुलगा मद्यधुंद अवस्थेत असल्याचा दावा केला आहे. तसेच वेडीवाकडी गाडी चालवल्यावर पोलीस पकडणारच असं सांगताना हा व्हिडिओ शंभर टक्के राऊत यांच्या मुलाचाच असल्याचा दावाही त्यांनी माध्यमांशी बोलताना केला. व्हिडिओत दिसणारी गाडी राऊत यांच्या मुलाच्याच नावावर असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. तसेच पोलिसाला दमबाजी करून कर्तव्यात अडथळा आणल्याप्रकरणी राऊतांच्या मुलावर कलम ३५३ अन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. पोलिसाला धमकी देणाऱ्या व्यक्तिला तुरुंगातच टाकलं पाहिजे, असंही त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, या व्हिडिओबाबत विनायक राऊत यांनी किंवा त्यांच्या मुलाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times