द्रविड, रोहित आणि विराटशी संवाद साधून बीसीसीआय पुढील पावलं उचलणार आहे. चेतन शर्मांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीच्या कामगिरीवरदेखील बीसीसीआय समाधानी नाही. त्यांच्याही कामांचं मूल्यांकन केलं जाईल. चेतन शर्मा यांची गच्छंती अटळ मानली जात आहे. बीसीसीआयच्या बैठकीला शर्मा यांना बोलावण्यात येणार का, याबद्दल अद्याप कोणतीही ठोस माहिती उपलब्ध झालेली नाही.
पुढील टी-२० विश्वचषक स्पर्धा वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत खेळवली जाणार आहे. त्या स्पर्धेत यंदाच्या विश्वचषकात खेळलेले अनेक खेळाडू दिसणार नाहीत. संघ महत्त्वाचा आहे, संघातील एखादा विशिष्ट खेळाडू आमच्यासाठी महत्त्वाचा नाही, असं बीसीसीआयच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्यानं सांगितलं आहे. गेल्या अनेक विश्वचष्क स्पर्धांमध्ये भारतीय संघ बाद फेरीत पराभूत झाला. त्यामुळे बीसीसीआय चिंतेत आहे.
यंदाच्या विश्वचषकात खेळलेला भारतीय संघ स्पर्धेतील सर्वात ‘वृद्ध’ संघ होता. संघाचं सरासरी वयोमान ३०.६ वर्षे होतं. यष्टीरक्षक फलंदाज दिनेक कार्तिक ३७ वर्षांचा आहे. त्याला या स्पर्धेत छाप पाडता आली नाही. त्यामुळे त्याला यापुढे संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. आर. अश्विन, विराट कोहली, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी यांचं वय ३२ वर्षांच्या पुढे आहे. त्यामुळे त्यांनाही बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. यापैकी कोहलीची कामगिरी उत्तम झाली आहे. स्पर्धेतील ६ महिन्यांत ४ अर्धशतकांसह त्यानं २९६ धावा फटकावल्या.